नाशिक : नाशिकचे मराठमोळे दिग्दर्शक तथा लेखक प्राजक्त देशमुख यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2020 हा जाहीर झाला असून महाराष्ट्रासाठी ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांच्या देवबाभळी या पुस्तकासाठी त्यांना हा सन्मान मिळाला असून यामागील सर्व श्रेय ते आपले कुटुंब आणि नाटकाच्या टिमला देऊ इच्छित आहे. दरवर्षी साहित्य अकादमीतर्फे 35 वर्षाच्या आतील लेखकांना हा पुरस्कार देण्यात येतो, 50 हजार रोख रक्कम आणि ताम्रपत्र हे या पुरस्काराचे स्वरूप असते. 


मराठी साहित्यासोबतच बंगाली साहित्यासाठी श्याम बंदोपाध्याय या लेखकाला पुराणपुराष या त्यांच्या पुस्तकासाठी पुरस्कार मिळणार आहे, त्रिसदस्यीय समितीने या पुरस्काराचे काम पाहिले होते. देवबाभळीला आजपर्यंत 39 पुरस्कार मिळाले आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारासाठी घोषणा झाल्याचा आनंद आहेच मात्र आमची नाट्यगृह अद्याप बंद असल्याने मी नाराज असून ती लवकरात लवकर खुली करा अशी मागणी त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे.  


लेखक प्राजक्त देशमुख  म्हणाले,  आजपर्यंत साहित्य अकादमी हे नाव फक्त ऐकत आलो होतो, एखाद्या नाटकाला किंवा त्याच्या संहितेला पुरस्कार मिळणे हे आतापर्यंत एक दोनदाच झालंय. दोन अडीच वर्ष झाले आमच्यासाठी आनंदाच्या बातम्या नाही आहेत. त्यामुळे पूर्ण नाट्य जगतासाठी ही एक महत्वाची घटना म्हणावी लागेल. पुरस्कारामागील पहिले श्रेय तुकोबाचे, अवलीचे आहे. ज्यामुळे मला सगळं लिहिण्याची प्रेरणा मिळाली. खूप मोठ श्रेय माझी आई, वडील, बायको आणि इतर कुटूंबाला जाते. जी माझी नाटकाची टीम आहे प्रसाद कांबळी आणि सर्व बॅक स्टेजची टीम यांचा देखील आहे.


माझ्या आनंदासोबत एक निराशेची किनार आहे की मी तुमच्या माध्यमातून मांडू इच्छितो..माझी कळकळीची विनंती आहे की जसे सर्व खुले करण्यात आले आहे तसं आमची रंगभूमी, नाट्यगृह सुरु करावी. आम्ही खूप नियम पाळणारी लोकं आहोत, सर्व अटी शर्तींचे आम्ही पालन करू कृपया  आमची रंगभूमी खुली करावी, अशी मागणी प्राजक्त देशमुख यांनी या वेळी केली. आमच्या घराण्याची वारकरी परंपरा आहे ते संस्कार माझ्यावर घडले. देवबाभळीचा अनुभवच खूप थ्रिलिंग होता. चित्रपट होऊन जातो मात्र नाटक हा सहप्रवासी असतो.  नाटकाला खूप मोठी मंडळी येऊन गेली जवळपास साडेतीनशे प्रयोग झाले,असे देखील ते म्हणाले.