मुंबई: देशाचे सरन्यायाधीस उदय लळीत आज निवृत्त होत असून त्यांच्या जागी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आज सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे देशाचे 50 वे सरन्यायाधीश असतील. तसेच आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा राज्यातील दुसरा दिवस असणार आहे. त्याचसोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत. 


धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार


न्या. धनंजय चंद्रचूड आज भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल. आज सकाळी 10 वाजता त्यांचा शपथविधी होईल. न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. त्यांचे वडील वायव्ही चंद्रचूड हेही देशाचे सरन्यायाधीश राहिले आहेत. न्या. चंद्रचूड यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी शबरीमाला, समलैंगिकता, आधार आणि अयोध्या प्रकरणांसह अनेक मोठ्या खटल्यांमध्ये न्यायाधीश म्हणून काम पाहिलं आहे. 


राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा तिसरा दिवस 


काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. आज ही यात्रा सकाळी सहा वाजता रामतीर्थ, बिलोली येथील शंकर नगर येथून सुरु होणार आहे. ही यात्रा नांदेड जिल्ह्यातील वजीरगांव फाटा येथे रात्री विश्रांतीसाठी थांबणार आहे.   
 
संजय राऊतांना जेल की बेल? 


पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीनावर आज फैसला होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्ट त्याचा राखून ठेवलेला फैसला जाहीर करणार आहे. तपासयंत्रणेचे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्या वतीनं करण्यात आला आहे. तर संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीने केला आहे. संजय राऊतांची न्यायालयीन कोठडीही संपत असल्यानं त्यांनाही आज कोर्टापुढे हजर केलं जाईल. 


अनिल देशमुखांच्या जामीनावर सीबीआय आपलं उत्तर सादर करणार 
 
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर सीबीआय आपलं उत्तर आज हायकोर्टात सादर करणार आहे. मुंबई सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला देशमुखांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. सीबीआयच्या याच एफआयआरवरून ईडीनं दाखल  केलेल्या ईसीआयआरमध्ये हायकोर्टानं दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवल्यानंतरही सीबीआय कोर्टानं देशमुखांना जामीन नाकारणं अयोग्य असल्याचा देशमुखांच्यावतीनं हायकोर्टात दावा करण्यात आला आहे. 
 
आदित्य ठाकरे यांचा सोलापूर दौरा 


शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर असून ते सांगोल्यातील संगेवाडी आणि मांजरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.त्यानंतर आदित्य ठाकरे महूद मार्गे जेजुरीला जातील.