मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आज संध्याकाळी सहा वाजता औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. त्यामध्ये नामांतरण, राज ठाकरे, राज्यसभा निवडणूक या विषयांवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे.
आज बारावीचा निकाल
राज्यातील विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता वाढवणारा बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या परीक्षेला 14,85,197 विद्यार्थी बसले होते. यापैकी 8,17,188 मुलं असून मुलींची संख्या 6,68,003 इतकी आहे. उद्या दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे.
महाविकास आघाडी पॅटर्न 2.0, आमदार एकत्रित हॉटेलमध्ये
राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांना एकत्रित करण्यात आलं असून त्यांना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबोधित केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना हॉटेल रेनेसॉमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर शिवसेनेच्या आमदारांना ट्रायडेंट हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. आज त्यांना राज्यसभेसाठी कशाप्रकारे मतदान करायचं याचं मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
भाजपच्या आमदारांची बैठक
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताज प्रेसिडेंसी या ठिकाणी भाजपा आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा निवडणूक प्रभारी आश्विनी कुमार वैष्णवी यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित असतील.
विधानपरिषदेसाई सचिन अहिर आणि आमशा पाडवी अर्ज दाखल करणार
शिवसेना विधानपरिषदेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे आमदार विधान भवन येथे उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.
अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या राज्यसभेच्या मतदानाचा निर्णय आज
कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असं स्पष्ट करत ईडीनं अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानाच्या परवानगी अर्जाला विरोध केला आहे. ईडीनं कोर्टात दाखल केलेल्या आपल्या उत्तरात हे स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला यांना मतदानाचा अधिकार देऊ नये याबाबत कळवल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी होणाऱ्या मतदानाआधी महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. आज मुंबई सत्र न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.
ईडीच्या चौकशीसाठी सोनिया गांधी उपस्थित राहणार नाहीत
कोरोनाची बाधा झाल्यामुळे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी ईडीसमोर हजर राहणार नाहीत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी मनी लॉंड्रींगच्या आरोपांबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीनं समन्स पाठवलं आहे. सोनिया गांधींना आज ईडीकडून चौकशीला बोलावण्यात आलं होतं. मात्र, सोनिया गांधी कोरोना संक्रमित असल्यानं त्या चौकशीला जाणार नाहीत. काँग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार ईडीला चौकशीसाठी पुढची तारीख देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.
अविनाश भोसलेंना आज सत्र न्यायालयात हजर करणार
पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसलेंची सीबीआय कोठडी आज संपणार आहे. भोसलेंना पुन्हा मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा भोसलेंचा दावा फेटाळत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. येस बँक आणि डिएचएफएल प्रकरणी झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचं प्रकरणात अविनाश भोसलेंना अटक करण्यात आलंय.
खीर भवानीमातेच्या यात्रेसाठी 200 हून अधिक काश्मिरी पंडित रवाना होणार
जम्मू कश्मीरच्या गंदेरबल जिल्ह्यातील खीर भवानीमातेच्या जत्रेसाठी 200 हून अधिक काश्मिरी पंडित जम्मूहून रवाना होणार आहेत. कडक सुरक्षेत या भाविकांना जत्रेसाठी नेलं जाईल. विस्थापित काश्मिरी पंडितांच्या सगळ्यात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी हा एक जत्रोत्सव आहे.