मुंबई : सरकार स्थापनेवेळी ज्या पद्धतीनं तिन्ही पक्षांच्या आमदारांना एकत्र करुन रणनीती आखण्यात आली त्याचपद्धतीनं राज्यसभा निवडणुकांसाठी पुन्हा मविआची एकजूट दाखवण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. अपक्ष आमदारांचं बळ मिळवण्यात महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत 12 अपक्ष आमदार उपस्थित आहेत. भाजपच्या खात्यात किती अपक्ष हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे नेते एच के पाटील यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची हॉटेल ट्रायडंटवर बैठक सुरु आहे. यात राज्यसभा निवडणुकीत कशाप्रकारे मतदान करायचं याबाबत माहिती दिलीय जातेय. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार उभा आहे. या दोन्ही उमेदवारांना जिंकण्यासाठी अपक्ष आणि इतर संघटनांच्या आमदारांचा मत फार महत्वाचे आहे. आतापर्यंत महाविकासआघाडील 12 आमदारांचा पाठिंबा मिळवण्यात यश आले आहे.
महाविकासआघाडीला पाठिंबा असणाऱ्या 12 आमदारांची नावे
- विनोद निकोले
- राजकुमार पटेल
- शामसुंदर शिंगे
- देवेंद्र भुयार
- मंजुळा गावित
- नरेंद्र बोंडेकर
- किशोर जोरगेवार
- अशिष जयस्वाल
- विनोद अग्रवाल
- संजय मामा शिंदे
- गिता जैन
- चंद्रकांत पाटील
येत्या 10 जूनला महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतांच्या संख्याबळानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक उमेदवार आणि भाजपचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात हे स्पष्ट आहे. पण 6 व्या जागेसाठी शिवसेनेकडून दुसरा आणि भाजपकडून तिसरा उमेदवारही रिंगणात उतरवण्यात आला आहे.
राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 42 आमदारांच्या मतांची गरज असेल. त्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी , शिवसेना यांनी आपल्या उमेदवारांना जिंकण्यासाठी आवश्यक असलेली मतं दिल्यानंतर काही शिल्लक राहतात . त्यामध्ये भाजपकडे 29 मतं शिल्लक राहतात. भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येण्यासाठी मग 13 अधिक मतांची गरज आहे. तर तिसर्या जागेसाठी, शिवसेनेकडे 13 मतं शिल्लक राहतात, कॉंग्रेसकडे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे 12 मतं शिल्लक राहतात. त्याचबरोबर महाविकास आघाडीला 12 इतर पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांना गाठणे हे भाजप आणि महाविकास आघाडीसाठी महत्त्वाच आहे .