मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान
देशाच्या नवीन उपराष्ट्रपतीपदासाठी आज मतदान होणार असून एनडीएकडून जगदीप धनकड आणि विरोधकांच्या कडून मार्गारेट अल्वा या उमेदवार आहेत. सध्याचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा कार्यकाल 10 ऑगस्टला संपणार आहे. 11 ऑगस्टला नवे उपराष्ट्रपती शपथ घेतील.


या निवडणुकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य मतदान करतील. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत मतदानप्रक्रिया पार पडेल. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होऊन निकाल लागेल असा अंदाज आहे.


सध्याची दोन्ही सभागृहातील भाजप खासदारांची संख्या
लोकसभा भाजप खासदार- 303 (खासदार संजय धोत्रे तब्येत बरी नसल्यानं मतदान करु शकणार नाहीत)  
लोकसभेतील एनडीएचे इतर सदस्य- 33


एनडीएचे लोकसभेतील एकूण खासदार- 336


राज्यसभेतील भाजप खासदार- 91
राज्यसभेतील एनडीएचे इतर सदस्य- 18
एनडीएचे राज्यसभेतील एकूण खासदार- 109


एनडीएचे एकूण खासदार- 445


भाजपला विजयासाठी 390 पेक्षा अधिक मतांची गरज आहे. शिवसेनेचे खासदार (उद्धव ठाकरे गट) या निवडणुकीत यूपीएच्या बाजूनं मतदान करणार आहे.


आज मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचा पुन्हा दिल्ली दौरा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. आज आझादी का अमृत महोत्सव बैठकीला ते उपस्थिती लावतील तर रविवारी निती आयोगाच्या बैठकीमध्ये ते सहभागी होतील. या दोन दिवसांच्या दौऱ्यात दिल्लीतील नेत्यांशी गाठीभेटी घेऊन मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 


संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडी चौकशी
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीनं वर्षा राऊत यांना समन्स पाठवलंय. सकाळी 11 वाजता त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. ईडीला वर्षा राऊत यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेच्या संदर्भात चौकशी करायची आहे. 


राज्यात पाच दिवस मान्सून सक्रिय होणार, पश्चिम महाराष्ट्र, कोकणाला ऑरेंज अलर्ट
येत्या 24 तासांत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.


नितेश राणे यांची पत्रकार परिषद
भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची आणि नितेश राणेंची पत्रकार परिषद होणार आहे. आज दुपारी 1 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात ही परिषद होणार आहे. नितेश राणे दीपक केसरकरांच्या आरोपांवर उत्तर देण्याची शक्यता आहे. तसेच, नितेश राणे उमेश कोल्हे प्रकरणाबाबत मोठा गौप्यस्फोट करणार आहेत अशी माहिती आहे.