Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
देशभरात दसरा सणाचा उत्साह -
दसरा (Dussehra) हा सण वाईटावर चांगल्याच्या विजय म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणार्या दसऱ्याच्या दिवशी (विजयादशमी) आपट्याच्या पानांच्या रूपात 'सोनं' एकमेकांना देऊन हा सण साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी भगवान राम यांनी लंकापती रावणाचा वध करुन विजय मिळवला होता. तसेच या दिवशी रावणाचा पुतळा तयार करुन त्याचे दहन केले जाते. या व्यतिरिक्त नवरात्रौत्सवाचा अखेरचा दसऱ्याचा दिवस असल्याने देवीचे विसर्जन दसरा झाल्यानंतर केले जाते. रावणाचा पुतळा दहन करताना प्रत्येकजण वाइट गोष्टींचा अंत करुन उत्तम मार्गावर जाण्याचा संकल्प करतात. बुधवारी देशभरात दसरा सण साजरा होणार आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपासून फारकत घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. हा वाद कोर्टात असला तरी दोन्ही नेत्यांमध्ये दसऱ्या मेळाव्यात आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कमध्ये होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न केला जात आहे. दोन्हीकडे मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. बीकेसी मैदानावर दोन ते तीन लाख कार्यकर्ते जमतील असा दावा, शिंदे गटाकडून केला जात आहे. दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे यांच्याकडून तयारी पूर्ण झाली आहे. राज्यभरातून मेळाव्यासाठी कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही तयारी केली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार? कुणावर टीका करणार? भाषणामध्ये कळीचा मुद्दा कोणता असणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात पोलिसांचा बंदोबस्त कसा असेल?
शिवाजी पार्क, दसरा मेळावा
2 डीसीपी
3 एसीपी
17 पोलीस निरिक्षक
60 एपीआय/पीएसआय
420 पोलीस कर्मचारी
- 65 पोलीस हवालदार
- 2 RCP प्लॅटून
- 5 सुरक्षा बल पथक
- 2 QRT शीघ्र कृती दल
- 5 मोबाईल वाहने
बीकेसी, दसरा मेळावा
4 डीसीपी
4 एसीपी
66 पोलीस निरिक्षक
217 एपीआय/पीएसआय
1095 पोलीस कर्मचारी
410 पोलीस हवालदार
8 RCP प्लॅटून
5 सुरक्षा बल पथक
5 शीघ्र कृती दल
14 मोबाईल वाहनं
RSS चा विजयादशमी उत्सव -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सकाळी 6:20 वाजता संघाचे स्वयंसेवक रेशीम भाग परिसरातून पथसंचलन करत निघणार आहेत. विविध मार्गातून हे पथसंचलन जाणार असून एका ठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत पथसंचलनाचा अवलोकन करणार आहेत. त्यानंतर 7:40 मिनिटांपासून रेशीम बाग मैदानावर विजयादशमी उत्सवाचा मुख्य सोहळा सुरू होईल. या सोहळ्यात सरसंचालक मोहन भागवत यांचे उद्बोधन होणार आहे... मुख्य सोहळ्याला प्रसिद्ध गिर्यारोहक पद्मश्री श्रीमती संतोष यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाच्या 97 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच विजयादशमी उत्सवाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून एका महिलेला स्थान देण्यात आले आहे.
दसरा मेळाव्यानिमित्त धडाडणार पंकजा मुंडेंची तोफ -
दरवर्षीप्रमाणे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा देखील दसरा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. भगवान बाबा यांच्या जन्मगाव असलेल्या श्री क्षेत्र सुपे सावरगाव (घाट) येथे दसरा मेळावा भरणार असल्याची माहिती कृती समितीने पत्रकार परिषदेतून दिली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात यावर्षी दोन दसरा मेळावे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भगवान गडाच्या पायथ्याशी एक तर दुसरा सावरगाव येथे दसरा मेळावा होणार आहे.
66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस -
आज 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस असून त्यानिमित्ताने दीक्षाभूमीवर संध्याकाळी दीक्षाभूमी स्मारक समितीकडून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी 7 च्या सुमारास सुरू होणाऱ्या या सोहळ्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय दिवसभर दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना आणि बौद्ध धर्मांना मानणारे लाखो अनुयायी दीक्षाभूमीच्या मुख्य स्तूपामध्ये दर्शनासाठी येत राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुल्लू दसरा समारंभाला हजेरी लावणार -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. येथे ते 3650 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. सकाळी साडेअकराच्या सुमाराला पंतप्रधान बिलासपूर एम्सचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी पाऊण वाजता ते बिलासपूरमधील लुहनू मैदानावर पोहोचतील आणि अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी करतील. तिथे ते एका सार्वजनिक कार्यक्रमालाही संबोधित करणार आहेत. दुपारी सव्वातीनच्या सुमाराला पंतप्रधान कुल्लूमधील धालपूर मैदानावर पोहोचतील आणि कुल्लू दसरा सोहळ्यात सहभागी होतील. कुल्लूच्या धालपूर मैदानात 5 ते 11 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आंतरराष्ट्रीय कुल्लू दसरा महोत्सव साजरा केला जाणार आहे. खोऱ्यातील हा उत्सव वैशिष्ठ्यपूर्ण आहे. या ऐतिहासिक कुल्लू दसरा सोहळ्यात पंतप्रधान ही अनुपम रथयात्रा अनुभवणार आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी कुल्लू दसरा सोहळ्यात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
प्रकाश आंबेडकर अकोल्यात -
6 ऑक्टोबरला अकोल्यात होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर पुढचे तीन दिवस सहकुटुंब अकोल्यात असणार आहेत. त्यांच्या पत्नी प्रा. अंजली आंबेडकर आणि मुलगा सुजात आंबेडकरही पुढचे तीन दिवस अकोल्यातील घरी असणार आहेत. आंबेडकर आज रात्रीच अकोल्यात पोहोचण्याची शक्यता आहे.
वर्ध्यात रावण दहन -
रावण वध म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतिक मानले जाते. प्रभू श्रीरामाने लंका नरेश रावणाचा पराभव करून त्याच्या कैदेतून सितामाईची सुटका केली होती. हीच परंपरा कायम ठेवत आज संध्याकाळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे वर्ध्यात महिलाश्रम च्या ग्राउंड वर प्रतीकात्मक रावण दहन होणार आहे.
केसीआर करणार नव्या पक्षाची घोषणा
तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगाणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव आज राष्ट्रीय पक्षाची घोषणा करणार आहे. दुपारी 1:19 वाजता केसीआर नव्या पार्टीची घोषणा करतील.
दिल्लीमधील सर्वात मोठी रामलीला
आज दिल्लीमध्ये देशातील सर्वात मोठा रामलीला कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये 23 बॉलिवूड अभिनेता आणि भाजपचे सात मोठे नेते उपस्थिती लावणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि स्टार प्रभास सहभागी होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम होणार आहे.
बारामुल्लामध्ये अमित शाह यांची सभा
अमित शाह यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. बारामुल्ला येथे अमित शाह यांच्या सभेचं आयोजन करण्यात आले आहे. येथे अमित शाह उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
Jio 5G लाँच -
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रिलायन्स जिओकडून आपल्या ग्राहकांना स्पेशल गिफ्ट मिळणार आहे. रिलायन्स जिओ आजपासून चार शहरांमध्ये 5G सेवेची चाचपणी (टेस्टिंग) करणार आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसी या चार शहरांचा समावेश आहे. ही बीटा सेवा जगातील सर्वात प्रगत 5G सेवा असेल असा कंपनीने दावा केला आहे.