Todays Headline : आजपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाहाचा मुहूर्त आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून घरोघरी तुळशीच्या विवाहाची लगबग सुरु होते. तुळीच्या लग्नानंतरच लग्नाच्या मुहूर्तांनाही सुरुवात होते. तसेच आज बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक कसं असणार याचे आज सादरीकरण होणार आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा आहे. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत.


राज्य सरकारकडून उदय लळीत यांचा सत्कार -
भारताचे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा राज्य सरकारच्या वतीने आड सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सकाळी साडे दहा वाजता राजभवन येथे हा सत्कार सोहळा सुरू पार पडणार आहे. 


मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्षांचा दौरा -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा आहे. चंद्रशेखर बावनकुळे स्वतः ठाणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात फिरून उमेदवारांची आणि भाजपच्या शक्तीची चाचपणी करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बावनकुळे आज ठाणे शहराचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप नेत्याच्या दौऱ्यानं राजकीय चर्चेला उधाण आले आहे.


आजपासून तुळशी विवाहाचा मुहूर्त -
कार्तिक शुद्ध द्वादशीपासून घरोघरी तुळशीच्या विवाहाची लगबग सुरु होते. कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या काळात तुळशीचा विवाह करता येतो. परंतु प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह केला जातो. अगदी घरच्या विवाह समारंभाप्रमाणे अंगणातील तुळशीचा विवाह केला जातो. या नंतरच लग्नाच्या मुहूर्तांनाही सुरुवात होते. आजपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाहाचा मुहूर्त असतो. 


बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे सादरीकरण -
बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक कसं असणार याचे आज सादरीकरण होणार आहे. सायंकाळी पाच वाजता मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सादरीकरण होणार आहे. या सादरीकरणाला उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे आणि माजी सुभाष देसाई यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. दादर परिसरात असलेल्या मुंबई महापुराच्या जुन्या बंगल्याच्या येथे बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक तयार करण्यात येणार आहे.


सतीश आळेकर यांना पुरस्कार प्रदान -
रंगभूमिदिनाचे औचित्य साधून आज विष्णुदास भावे गौरवपदक प्रदान समारंभ पार पडणार आहे. लेखक, नाटककार, दिग्दर्शक व अभिनय अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले सतीश आळेकर यांना ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचे शुभहस्ते गौरवपदक प्रदान करण्यात येणार आहे. 


मनसेचं आंदोलन -
मुंबईतील असल्फा येथील खड्डेमय झालेल्या एनएसएस रोडच्या निर्मितीसाठी मनसेकडून आजपासून ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली आणि पदाधिकारी खड्डे पडलेल्या रस्त्यावर काम सुरू होईपर्यंत बसून ठिय्या आंदोलन करणार आहेत. 


विखे पाटील राहुरीमध्ये -
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कृषीमंत्री अब्दुल सत्तार राहुरी विद्यापीठमध्ये आंतर विद्यापीठ युवक महोत्सवासाठी येणार आहेत. महाराष्ट्रातील 22 विद्यापीठातील 1100 विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तारही उपस्थित राहणार आहेत. राहुरीतील कृषी विद्यापीठात आजपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 
नऊ तारखेला राज्यपालांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. 


राष्ट्रवादीचं मंथन शिबिर -
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिराचा आज दुसरा दिवस आहे. या शिबिराला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज उपस्थित राहणार आहेत. सकाळी दहा वाजता शिबिराला सुरुवात होणार आहे. शिबिराच्या पहिल्या दिवशी अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अनेक दिग्गज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 


नांदेडमध्ये भव्य धम्म मेळावा -
नांदेड येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज दुपारी बारा वाजता धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने भव्य धम्म मेळावा कृषी उत्पन्न बाजार समिती नवामोंढा येथे संपन्न होणार आहे. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या मेळाव्यासाठी नांदेड,परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील हजारो आंबेडकर अनुयायी हजेरी लावणार असून प्रकाश आंबेडकर या मेळाव्यात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत.


मराठी अर्थशास्त्र परिषदेचे जालन्यात तीन दिवस राष्ट्रीय अधिवेशन - 
जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेचे 45 वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन जालना शहरातील जे.ई. एस.  महाविद्यालयात पाच ते सात नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी ( ता. 05)सकाळी साडेदहा वाजता केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्दघाटन होईल. अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. आर. बी. भांडवलकर हे राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड तसेच आ. प्रताप अडसड, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर,जे.ई. एस. चे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया,सचिव  श्रीनिवास भक्कड,यांची प्रमुख उपस्थिती राहील. 


हवेची गुणवत्ता 'गंभीर', दिल्लीमधील शाळा बंद -
दिल्लीमधील हवेची गुणवत्ता 'गंभीर' श्रेणीत पोहोचली आहे. दिल्ली-एनसीआरमधील वाढतं प्रदूषण चिंतेचा विषय बनलं आहे. दिल्लीमध्ये आजपासून आठ नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत ऑनलाइन वर्ग चालणार आहेत. पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग ऑनलाईन माध्यमातून चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तूर्तास, हे आदेश 8 नोव्हेंबरपर्यंत लागू असतील. इयत्ता 9वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीही ऑनलाईन वर्ग घेता येतील, असंही आदेशात म्हटलं आहे.


योगी आदित्यनाथ गोरखपूर दौऱ्यावर -
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आजपासून दोन दिवसांच्या गोरखपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री 181 उद्योगपती आणि व्यापाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. दुपारी तीन वाजता बैठक होणार आहे. बीआरडी मेडिकल कॉलेजच्या स्वर्ण जंयती कार्यक्रमात मुख्यमंत्री सामील होणार आहे. 


इंग्लंडसाठी करो या मरोचा समाना -
ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी 20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेत आज सुपर 12 च्या ग्रुप 1 मधील अखेरचा सामना रंगणार आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका ((England vs Sri Lanka) या सामन्यानंतर केवळ ग्रुप 2 मधीस तीन साखळी सामने होणार असून त्यानंतर सेमीफायनल सामन्यांना सुरुवात होणार आहे. दरम्यान आतापर्यंत ग्रुप 1 मधून न्यूझीलंडचा संघ अप्रतिम खेळ करत सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. तर आयर्लंड, अफगाणिस्तान, श्रीलंका या संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची चुरस आहे. सध्या ऑस्ट्रेलियाकडे 7 गुण असून आता इंग्लंड श्रीलंकेविरुद्ध जिंकल्यास त्यांच्याकडेही 7 गुण येतील. पण इंग्लंडचा नेटरन रेट चांगला असल्याने ते नक्कीच सेमीफायनलमध्ये जातील.