Nagpur News : समृद्धी महामार्गाची निर्मिती करताना इंडियन रोड कॉंग्रेसच्या वृक्षतोड आणि वृक्षारोपण नियमांची पायमल्ली झाल्याचा दावा करत पर्यावरणवाद्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाच ई-मेल केला असून त्यांनी वृक्षारोपण पूर्ण झाल्याशिवाय प्रकल्पाचे उद्घाटनही करु नये अशी मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. नागपूर ते शिर्डी (Nagpur to shirdi) पर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन नोव्हेंबर महिन्यात होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) स्वतः दिली होती. मात्र, पर्यावरणवाद्यांनी उचललेल्या वृक्षारोपणाच्या प्रश्नामुळे याची दखल घेतल्यास समृद्धी महामार्गाची नोव्हेंबर महिन्याची डेडलाईन ही पुढे जाण्याची शक्यता आहे.


महामार्ग तयार करताना नियमानुसार आवश्यक असलेले वृक्षारोपणच या मार्गालगत अद्याप झाले नसल्याचे आरोप पर्यावरणवाद्यांनी केले आहेत. एवढेच नाही तर त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इमेल ही केले आहे. पर्यावरणवाद्यांचा दावा आहे की समृद्धी महामार्ग बांधताना सुमारे दोन लाख वृक्ष तोडले गेले असून इंडियन रोड काँग्रेसच्या निकषाप्रमाणे महामार्गाच्या लगत साडे सात लाख वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या मेलमध्ये त्याचीच आठवण पर्यावरणवाद्यांनी करून दिली आहे. पंतप्रधानांनी वृक्षारोपण झाल्याशिवाय महामार्गाचे उदघाटन करू नये असे आवाहनही इमेल मध्ये करण्यात आले आहे. 


राज्यासाठी गेमचेंजर ठरू शकणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उदघाटन कधी होणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून आहे. मात्र, या महामार्गावर आवश्यक असलेले वृक्षारोपणच झालेले नाही. त्यामुळे वृक्षारोपण झाल्याशिवाय समृद्धी महामार्ग सुरु करू नये अशी मागणी पर्यावरणवाद्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच केली आहे. त्यामुळे अनेकदा उद्घाटनाची चर्चा होऊन उद्घाटन न होऊ शकलेल्या समृद्धी महामार्गावर प्रवासासाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.


उपराजधानी नागपूर ते राजधानी मुंबई दरम्यानचा हा सुमारे 710 किलोमीटर लांबीचा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा नुसता महामार्ग नाही, तर महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरेल, राज्यासाठी गेमचेंजर ठरेल, खऱ्या अर्थाने समृद्धी आणेल असे मोठमोठे दावे केले जात आहे. या महामार्गामुळे नागपूर ते मुंबईचे अंतर कमी होऊन प्रवासाच्या वेळेतही कमालीची बचत होणार असल्याने विदर्भ मराठवाड्यातील लाखो लोकं या महामार्गाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा करत आहे. 


पर्यावरणवाद्यांच्या दाव्यांची सत्यता


पर्यावरणवाद्यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात एबीपी माझाने समृद्धी महामार्गावर जाऊन खरोखर वृक्षारोपण करण्यात आले आहे किंवा नाही याची तपासणी केली. समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीच्या दरम्यान एकूण रुंदी 120 मीटरची आहे. त्यापैकी 60 मीटरवर येणारे आणि जाणारे असे दोन लेन तसेच त्यादरम्यानच्या दुभाजक आहे. तर महामार्गाच्या दोन्ही बाजूला महामार्गापासून संरक्षण भिंतीपर्यंत प्रत्येकी 30 मीटर रुंदीची मोकळी जागा आहे. महामार्ग बांधताना तोडण्यात आलेल्या दोन लाख झाडांच्या मोबदल्यात याच मोकळ्या जागेत साडे सात लाख वृक्षारोपण करणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या तरी समृद्धी महामार्ग लगतचा हा पट्टा ओसाड आहे. तिथं एकही वृक्षाचे रोपण झाल्याचे दिसून आले नाही. 


प्रशासनाचे दुर्लक्ष; अधिकारी गप्प


महामार्ग लगत मुंबईपासून नागपूरपर्यंत गॅसची पाईपलाईन टाकायची आहे, त्याचे काम सुरु झाले असून ते संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे ती पाईपलाईन टाकल्याशिवाय केलेले वृक्षारोपण वाया जाणार अशी भीती आहे, त्यामुळे वृक्षारोपण केले नाही असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र यावर अधिकृतरित्या बोलणे कर्मचाऱ्यांनी टाळले आहे. असे असले तरी सौंदर्यीकरणाच्या नावाखाली दोन्ही लेनच्या मध्ये दुभाजकाच्या जागेत काही लहान रोपं लावण्यात आली आहे. मात्र, नीट निगा न ठेवल्याने अनेक रोपं सुकली असून त्याकडे ही एमएसआरडीसी च्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. 


वृक्षारोपणातील अनेक अडथळे


वृक्षारोपणाला फक्त गॅस पाईपलाईनचा हाच एक अडथळा नाही. तर समृद्धी महामार्गाच्या लगत भविष्यात महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे ही नियोजन आहे. त्याच्या डीपीआरवर सध्या फक्त चर्चा सुरु आहे. त्यामुळे भविष्यात जर समृद्धी महामार्गाच्या एका बाजूला गॅसची पाईपलाईन आणि दुसऱ्या बाजूला बुलेट ट्रेनचे मार्ग असणार असेल, तर लाखोंच्या संख्येने वृक्षारोपण कुठे करायचे असा प्रश्न निर्माण होणारच आहे. त्यामुळे सध्या अधिकारी या विषयावर मौन बाळगून आहेत. मात्र, पर्यावरणवाद्यांनी थेट पंतप्रधानांना साकडे घातल्याने हा मुद्दा कोणत्या वळणावर जातो आणि समृद्धी महामार्गाचे उदघाटणं केव्हा होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


महत्त्वाची बातमी


Amritsar: अमृतसरमध्ये गोळीबारात जखमी झालेल्या शिवसेना नेते सुधीर सूरी यांचा मृत्यू, आरोपी अटकेत