मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


राज्यसभेसाठी अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात सस्सीखेच सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर एका उमेदवारानं माघार घेतली नाही तर ही लढत अटीतटीची होणार आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात लढत होणार का हे आज स्पष्ट होईल.
 
गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतीदिन
भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा आज आठवा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने बीड जिल्ह्यातील वंचित, पिडित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं असून या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. धनंजय मुंडेही गोपीनाथ गडावर दर्शनाला जाणार आहेत.


राज ठाकरेंच्या आदेशानुसार भोंग्याबाबत पत्रवाटप
राज ठाकरेंच्या आदेशानुसार आज भोंग्याबाबतचं पत्रवाटप होणार आहे. राज ठाकरेंनी एक पत्र ट्विट करत मनसेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. त्यांनी आपल्या पत्रात 'मशिदीवरील भोंग्याचा निकाल लावायचाय, कामाला लागा', असं म्हटलंय. हे पत्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पोहोचवण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. 


मास्कबाबत येत्या 15 दिवसांत निर्णय
निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या, असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. काल राज्यात 1045 नवीन रुग्णांचे निदान झालं. तर, मुंबईत 704 रुग्णांचं निदान झालं. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कालच्या टास्कफोर्सच्या बैठकीत केलंय. मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या 97 टक्के रुग्ण आहेत अशी माहिती टास्क फोर्सच्या बैठकीत देण्यात आली.


मुक्ताईंच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
आज सकाळी 10 वाजता मुक्ताईच्या पालखीचं प्रस्थान जळगावहून पंढरपूरकडे होणार आहे. आषाढी एकादशी निमित्ताने मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा संकटामुळे ही पालखी केवळ चाळीस वारकऱ्यांना घेऊन बसने पंढरपूर रवाना झाली होती. यंदा मात्र कोरोनाचे निर्बंध नसल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. शेकडो दिंड्या, पालख्या आणि हजारो वारकरी संत मुक्ताईच्या पालखीसह पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहेत. 


काश्मीरमधील टार्गेट किलिंगवर अमित शाह यांनी उच्चस्तरिय बैठक बोलवली
काश्मीरमध्ये गोळीबाराच्या घटना सुरुच आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह टार्गेट किलिंगचा आढावा घेणार आहेत. काल मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बाहेरुन आलेल्या दोन नागरिकांवर गोळीबार केला आहे. दोघंही जखमी आहेत. काल कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक कर्मचाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली होती. गेल्या 21 दिवसांत काश्मीरमध्ये सात टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या आहेत. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.


आएनएस निःशंक आणि आयएनएस अक्षय सेवामुक्त होणार
भारतीय नौदलात पराक्रम, शौर्य गाजविण्याऱ्या आयएनएस निःशंक, आयएनएस अक्षय या दोन युद्धनौका सेवामुक्त होणार आहेत. भारतीय नौदलात 32 वर्षे गौरवशाली सेवा बजावणाऱ्या आणि भारत पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या या दोन युद्धनौकाना नेव्हल डॉकयार्ड येथे सूर्यास्ताच्या वेळी निरोप दिला जाणार आहे.


पुणतांबा शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस
पुणतांबा धरणे आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज मोफत दूध वाटप सह शिल्लक उसाची होळी करत शेतकरी सरकारचा निषेध करणार आहेत. याशिवाय पथनाट्यातून कृषीकन्या शेतकऱ्यांची व्यथा मांडणार आहेत. कृषीमंत्री दादासाहेब भुसे येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. 
 
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उद्योगपतींचा भव्य ग्राऊंड ब्रेकींग सेरेमनी
आज लखनऊ या ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उद्योगपतींचा भव्य ग्राऊंड ब्रेकींग सेरेमनी होणार आहे. यावेळी सगळे बडे उद्योगपती उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे


‘सम्राट पृथ्वीराज’ आज रिलीज 
अक्षय कुमार आणि मनुशी छिल्लरचा चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’ आज रिलीज होणार आहे.