हिंगोली: भाजप जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते यांच्या धास्तीने आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप मयताच्या पत्नीने केला आहे. या प्रकरणी आपल्याला न्याय मिळावा अशी मागणीही तिने पत्राच्या माध्यमातून केली आहे. दरम्यान, मयताने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आणि कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते यांच्या हिंगोली जिल्ह्यात दोन शैक्षणिक संस्था आहेत. या दोन पैकी हात्ता गावातील शैक्षणिक संस्थेवर उत्तम काईट हे लिपिक पदावर होते आणि त्यांचे पुतणे पांडुरंग काईट हे वारंगा येथील संस्थेवर नोकरीला आहेत. 30 एप्रिल रोजी अचानक वारंगा गावातील वडकुते यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये कार्यरत असणारे मयत उत्तम काईट यांची पुतणे पांडुरंग काईट यांना कर्तव्य मुक्त करण्यात आले. त्यामुळे कागदपत्र हस्तगत करण्यासाठी दोन्हीही शैक्षणिक संस्थेवरील शिक्षकांना वारंगा येथील शैक्षणिक संस्थेवर बोलवण्यात आले आणि त्या ठिकाणी पांडुरंग काईट यांना कागदपत्र देण्यात आले. त्या कागदपत्रांवर खाडाखोड करण्यासाठी मयत लिपिक उत्तम काईट त्यांना वडकुते आणि त्यांच्या दोन मुलांकडून धमकावण्यात आले. त्यावर उत्तम काईट ऐकत नसल्याने उत्तम काईट यांना शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रामराव वडकुते यांनी त्यांच्या दोन मुलांना मारहाण केल्याचा आरोप मयत उत्तम काईट यांच्या पत्नीने केला आहे
मयत लिपिक उत्तम काईट यांनी मृत्यूपूर्वी संपूर्ण प्रकार एका चिठ्ठीमध्ये लिहून ठेवला होता. ती चिठ्ठी काही दिवसापूर्वी समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. त्यांना आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या संस्थेचे अध्यक्ष रामराव वडकुते आणि त्यांच्या दोन मुलांनी त्रास दिला असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. रामराव वडकुते आणि यांच्या दोन मुलांनी उत्तम काईट यांना मारहाण केल्याची ऑडिओ क्लिप सुद्धा समाज माध्यमात व्हायरल होत आहे. या प्रकरणी रामराव वडकुते यांनी हे संपूर्ण आरोप फेटाळले आहेत
उत्तम काईट यांच्या निधनानंतर आपल्याला न्याय मिळावा यासाठी काईट कुटुंबीय प्रशासन दरबारी खेटा मारत आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दोन वेळेस निवेदन देऊनही त्यावर कारवाई होत नाही. विशेष म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतरसुद्धा आठ दिवस कुठलीही कारवाई केली नसल्याचा धक्कादायक खुलासा मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.