मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा शेवटचा दिवस - 
अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नसेल तर लवकर भरून घ्या. कारण इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची  शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे.  त्यामुळे करदात्यांना आयटीआर भरण्यासाठी काही तासच शिल्लक राहिले आहेत. आयकर विभागाकडून 31 जुलै पर्यंत आयटी रिटर्न भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्यापर्यंत ITR भरला नाही तर पाच हजार रूपये दंड भरावा लागणार आहे. 


 युवा सेनेची स्वाक्षरी मोहीम -
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी आज युवासेनेकडून राज्यपालांविरोधात राज्यातल्या प्रत्येक विधानसभेत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.  


 राज्यपालांनी माफी मागावी - उद्धव ठाकरे
 मुंबईसंदर्भात केलेल्या वक्तव्याची राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यपालांना घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी कोल्हापूर जोड्यावरुन उद्धव ठाकरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याप्रकरणी राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता. 
 
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीही नाराज -
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वकत्व्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच फडणवीस म्हणाले की, राज्यपालांच्या वक्तव्याशी भाजपचा संबंध नाही. 


 नाना पटोले काय म्हणाले?
काँग्रेसचे दिग्गज नेता नाना पटोले म्हणाले की, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं वक्तव्य अपमानजनक आहे. केंद्र सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा. त्यांना गुजरात अथवा राज्यस्थानला पाठवायला पाहिजे. कोश्यारींच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आज आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता. 
 
 एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर - 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या ते भेटीगाठी घेणार आहेत. त्यांचा हा दौरा मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आहे, अशी चर्चा आहे. 


 पंतप्रधान ‘मन की बात’ कार्यक्रमातून साधणार संवाद -
पंतप्रधानांचा जनतेशी होणारा मासिक संवादात्मक कार्यक्रम, ‘मन की बात’ उद्या म्हणजेच 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांनी आवर्जून ऐकावा, असे  आवाहन पंतप्रधानांनी केले  आहे.  मन की बात कार्यक्रमाचा हा 91 वा भाग आहे. 


 अमित शाह भाजपच्या संयुक्त राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत हजेरी लावणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पाटाना येथे होणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमध्ये उपस्थिती दर्शवणार आहे.  या कार्यक्रमात अमित शाह संबोधित करणार आहेत. 


 संयुक्त किसान मोर्चाचं केंद्र सरकार विरोधात आंदोलन -
संयुक्त किसान मोर्चाने  आज केंद्र सरकारविरोधात चक्काजामची घोषणा केली आहे. एमएसपी कमिटीच्या धोरणाविरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यासोबत आंदोलनावेळी दाखल झालेले गुन्हा माघार न घेतल्यामुळे आंदोलन पुकारण्यात आले आहे. पंजाब, हरियाणा आणि पश्चिमी उत्तर प्रदेश या भागात आंदोलन दिसून येईल. 


 भारत-पाकिस्तान सामना -
 राष्ट्रकुल स्पर्धेत रविवारी भारतीय महिला आणि पाकिस्तान महिला संघामध्ये लढत होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता सामना रंगणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिलांना ऑस्ट्रेलियाकडून तीन विकेटनं पराभव स्वीकारावा लागला होता.