मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस विक्रांतचे अनावरण


पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळ आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर असून आज भारताची पहिली स्वदेशी विमानवाहक नौकेचे अनावरण करणार असून ही नौका आज नौदलाच्या ताफ्यात सामिल होणार आहे. पंतप्रधान कोची शिपयार्ड लिमिटेडमध्ये पहिली स्वदेशी विमानवाहक नौका आयएनएस विक्रांत देशाला समर्पित करणार आहेत. या कार्यक्रमात देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी 1.30 वाजता मंगळुरूतील 3800 कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्धाटन करणार आहेत. 


उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नोंदणी आणि मुद्रांक भवनाचे भूमिपूजन 


पुण्यातीलविधान भवनासमोरील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या नोंदणी आणि मुद्रांक भवनाचे भूमिपूजन आणि मोबाईल ॲप, नवीन संकेतस्थळ तसेच इतर ई-सुविधांचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी 3.15 वाजता होणार आहे. 


जम्मू काश्मीरमधील हिंदूंच्या झालेल्या हत्येसंबंधी SIT च्या मागणीवर सुनावणी


जम्मू काश्मीरमध्ये 1990 ते 2003 या दरम्यान हिंदूंच्या झालेल्या हत्यांची चौकशी करण्यासाठी SIT ची स्थापना करावी अशी मागणी करत एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. 


तिस्ता सेटलवाड यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी 


तिस्ता सेटलवाड यांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात दुपारी 2 वाजता होणार आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने तिस्ता सेटलवाड यांना अंतरिम जामीन देण्याचे संकेत दिले होते. गुजरातमध्ये झालेल्या दंगलीमध्ये तिस्ता सेटलवाड यांनी तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दंगे घडवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून गेल्या दोन महिन्यांपासून त्या तुरुंगात आहेत. 


आशिया चषकमध्ये पाकिस्तान आणि हॉंगकॉंग भिडणार


आशिया चषकमध्ये आज पाकिस्तान आणि हॉंगकॉंग यांच्यामध्ये करो या मरो अशी लढत होणार आहे. विजेता संघ सुपर 4 साठी पात्र ठरेल तर पराभूत संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. हा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता खेळवण्यात येणार आहे. अ गटामध्ये भारताने पहिल्या क्रमांकारवर विराजमान आहे. ब गटामध्ये अफगाणिस्तान अव्वल स्थानी आहे.