मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 ऑगस्टपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकपासून या दौऱ्याची होणार असून मुख्यमंत्र्यांचा आजचा मुक्काम मालेगाव येथे असणार आहे.


अजित पवारांच्या पहाणी दौऱ्याचा आज दुसरा दिवस
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या नुकसान पहाणी दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना ते भेट देणार आहेत. आज अजित पवार यवतमाळ मुक्कामी असणार आहेत.


मुंबई महापालिका आरक्षण सोडत आज 
मुंबई महापालिका निवडणुकीकरता आरक्षण सोडत आज जाहीर होणार आहे. न्यायालयानं यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणासह प्रभाग आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता बालगंधर्व रंगमंदीर बांद्रा या ठिकाणी होणार आहे. 


जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत
आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत होणार आहे. हा कार्यक्रम जिल्हास्तरावर टप्प्या टप्प्याने घेतला जाणार आहे. 


आरे मेट्रो कारशेड अतिरिक्त झाडे तोडीविरोधात याचिकेवर आज सुनावणी
आरे मेट्रो कारशेडसाठी अतिरिक्त झाडे तोडीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यतेखाली होणार आहे. दरम्यान, आरेमध्ये काल रात्री मोठ्या संख्येने पर्यावरण प्रेमी जमा झाले होते. आरे कार शेड 3 जवळ मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. 


शरद पवार नाशिक दौऱ्यावर 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुपारी 1 वाजता नशिकमध्ये येणार आहेत. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या ते गाठीभेटी घेतील. यावेळी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. शरद पवार आज नाशिक मुक्कामी असणार आहेत.


अनिल देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी
वाढतं वय आणि शारीरिक आजारांमुळे जामीन मंजूर करा अशी विनंती अनिल देशमुखांनी उच्च न्यायालयाला केली आहे. तपासयंत्रणेला देण्यासारखं आता काहीही उरलेलं नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुखांच्या जामिनावरील याचिकेवर हायकोर्टात आज सुनावणी सुरू होणार आहे. 


नवाब मलिकांच्या जामीन याचिकेवर सुनावणी 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीनसाठीच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. विशेष पीएमएलए कोर्टात मलिकांनी दाखल केलेल्या याचिकेला ईडीचा जोरदार विरोध आहे. 


संसदेत आजही गोंधळ होण्याची शक्यता 
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींनी केलेली टिप्पणी आणि सोनिया गांधी-स्मृती इराणी वाद आजही रंगण्याची चिन्हं असून त्यावरून संसदेत गोंधळ होण्याची शक्यता आहे. राज्यसभेत खासदारांच्या निलंबनावरून सुरू असलेल्या खासदारांच्या 50 तासाचे रिले आंदोलन आज संपणार आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू आणि गुजरात दौऱ्यावर 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता पंतप्रधान अन्ना विद्यापीठाच्या 42 व्या दिक्षांत समारंभात सहभागी होणार आहेत. दुपारी 4 वाजता गांधीनगर मध्ये विविध योजनांचा शुभारंभ आणि शिलान्यास करणार आहेत.