मुंबई : फॉक्सकॉननंतर नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प आता वडोदऱ्यात गेल्यानंतर राज्यातील सरकारवर टीकेची झोड उठत आहे. या प्रकरणावर आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकल्प मविआ सरकारच्या काळात म्हणजे, 21 सप्टेंबर 2021 रोजीच गुजरातला गेला असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. तसेच यावरुन आता शिळ्या कढीला उकळी फोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले. 


उदय सामंत म्हणाले की, विरोधक टीका करण्यापलिकडे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याव्यतिरिक्त काहीच करत नाहीत. 21 सप्टेंबर 2021 रोजी त्यासंबंधी केंद्र सरकारनं निवेदन काढण्यात आलं होतं. त्याचवेळी हा प्रकल्प गुजरातला गेला होता. आम्ही हा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करु असं मी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. पण त्या आधीच वर्षभर हा प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यामुळे शिळ्या कढीला उकळी फोडल्यामध्ये काही अर्थ नाही. 


उदय सामंत पुढे म्हणाले की, एक वर्षापूर्वी हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर त्यावेळच्या सरकारने कोणतंही पत्र लिहिलं नाही. हा प्रकल्प परत यावा यासाठी कोणताही प्रयत्न केला गेला नाही. त्यामुळे एक वर्षापूर्वी गेलेला प्रकल्प आता गेला असल्याचं सांगत विरोधक जनतेमध्ये संभ्रम निर्माण करतात. फॉक्सकॉन आणि आताचा प्रकल्प हा गेल्या सरकारच्या काळात गुजरातमध्ये गेला आहे. पण राज्यातील युवकांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. एखादा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत. 


काय म्हणाले होते उद्योगमंत्री उदय सामंत 'माझा कट्टा' या कार्यक्रमात ? 


एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले होते की, एअरबसच्या बाबतीत होणारा प्रकल्प नागपूरच्या मिहान नागपूरला होणार आहे. त्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. टाटाच्या सहकार्याने हा प्रकल्प होणार आहे.


या आधी हजारो कोटींचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प, जो महाराष्ट्रातील दोन लाख युवकांना रोजगार देणार होता, तो प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर आता हा 22 हजार कोटींचा हा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट गुजरातला गेला. राज्यातील लाखो युवकांना रोजगार देणारे प्रकल्प जर असे बाहेर जात असतील तर राज्य सरकारच्या कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.