मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूरच्या संजय पवार यांचे नाव फायनल केले आहे. आज संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेने संजय पवार यांचे नाव फायनल केल्याचं संजय राऊत यांनी आज सांगितलं. 


संभाजीराजे छत्रपतींनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे संभाजीराजेंची नेमकी भूमिका काय हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 
 
वाराणसी- ज्ञानवापीशी संबंधीत दुसऱ्या याचिकेवर आज सुनावणी
ज्ञानवापीशी संबंधीत दुसऱ्या याचिकेवर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. ज्यात ज्ञानवापीचा पूर्ण ताबा हिंदूना द्या, विश्वेश्वरच्या नियमित पूजेची परवानगी द्यावी, ज्ञानवापी परिसरात मुसलमानांना बंदी घालण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या याचिकेवर आज दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. दरम्यान, या संबंधिच्या एका याचिकेची सुनावणी ही 26 रोजी होणार आहे. 


हिंदू पक्षाची काय भूमिका आहे?
1. शृंगार गौरीच्या रोजच्या पूजेची मागणी.
2. वाजुखान्यात सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या पूजेची मागणी.
3. नंदीच्या उत्तरेकडील भिंत तोडून डेब्रिज हटवण्याची मागणी.
4. शिवलिंगाची लांबी, रुंदी जाणून घेण्यासाठी सर्वेक्षणाची मागणी.
5. वाळूखान्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी.


मुस्लिम पक्षाची बाजू
1. वजूखाना सील करण्यास विरोध
2.  1991 कायद्यांतर्गत ज्ञानवापी सर्वेक्षण आणि  खटल्यावर प्रश्नचिन्ह.


पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावरून आज भारतात परतणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावरून भारतात परत येणार आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांनी क्वॉड देशांच्या प्रमुखांची भेट घेतली. या दौऱ्यामध्ये मोदींनी जपानच्या प्रमुख उद्योगपतींची भेट घेतली. 
 
आज सकाळी 11 वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक
ऑल इंडीया बॅकवर्ड अँण्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लाईज फेडरेशनची भारत बंदची हाक
केंद्र सरकारकडून विविध मागासवर्गीयांच्या जनगणनेला नकार दिल्या विरोधात ऑल इंडीया बॅकवर्ड अँण्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लाईज फेडरेशनने आज भारत बंदची हाक दिली आहे.
 
मध्य प्रदेशमध्ये आज संध्याकाळी 7 ते 9 मध्ये पेट्रोलपंप बंद
मध्य प्रदेशमध्ये आज संध्याकाळी 7 ते 9 या दरम्यान पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी अबकारी कराच्या नावाखाली जो अॅडव्हान्स घेतला आहे, तो अॅडव्हान्स आता दर कमी झाल्यानंतर परत करण्यात यावा अशी मागणी पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनची केली आहे. त्यामुळे ही बंदची हाक देण्यात आली आहे. 


लखनौ आणि बंगळुरू यांच्यात आज लढत
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore) आमने सामने येणार आहेत. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालीफायरमध्ये पराभूत झालेल्या संघाची भिडणार आहे. तर, पराभूत झालेल्या संघाचा प्रवास इथेच संपेल. यामुळं आयपीएल 2022 मधील आपलं आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील. लखनौच्या संघाचं नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करत आहे. तर, आरसीबीच्या संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) संभाळत आहे.