मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


नागपुरात राष्ट्रवादी आणि नवनीत राणांचे हनुमान चालीसा पठण
आज दुपारी बारा वाजता राष्ट्रवादीचे हनुमान चालिसा पठण होईल. त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर राणा दाम्पत्याला हनुमान चालिसा पठण करण्यासाठी वेळ दिला आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना काही अटींवर नागपुरातील राम नगर मधील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु, परवानगी देत असताना त्यांना काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींचे पालन करूनच त्यांनी हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे, अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.


नरेंद्र मोदी आणि अमित शाह गुजरात दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता राजकोटमधील एका रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहेत. तर अमित शाह तटरक्षक दलाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 


आयएनएस गोमती युद्धनौका सेवामुक्त होणार
आयएनएस गोमती युद्धनौकेचे डीकमिशनिंग होणार आहे. नेव्हल डॉकयार्ड येथे या युद्धनौकेच्या डीकमिशनिंग (सेवामुक्त होणार आहे )चा कार्यक्रम पार पडेल. या जहाजाने 34 वर्षांपासून देशाची गौरवशाली सेवा केली आहे आणि सध्या हे भारतीय नौदलातील सर्वात जुन्या युद्धनौकेपैकी एक आहे. या कार्यक्रमला वाईस अडमीनरल अजेंद्र बहादूर सिंह सह इतर महत्वाचे नौदल अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी साडे 5 वाजता कार्यक्रमाला सुरवात होईल. 


राज ठाकरे यांचा मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद
राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा  दुपारी 3 वाजता


ओवैसी यांची भिवंडीत सभा
ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा गाजत असताना एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आज भिवंडीतील परशुराम टावरे स्टेडियम येथे सभा घेणार आहेत. ही सभा संध्याकाळी 7  वाजता होणार आहे.


जमीयत उलेमा हिंद संघटनेचे मोठे संमेलन, 5000 जणांचा सहभाग
भारतीय मुस्लिमांसमोर असलेल्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी जमीयत उलेमा ए हिंद (मौलाना महमूद मदनी ग्रुप) चे आज सहारणपूरमध्ये मोठं संमेलन होणार आहे. यामध्ये 5000 बुद्धीवादी मुस्लिम सहभागी होणार असल्याची माहिती आहे. ज्ञानवापी मशिद प्रकरण आणि कुतूबमिनार प्रकरणावरुन देशभर सामाजिक वातावरण तापलं असताना हे संमेलन होणार असल्यांने याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हे संमेलन सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. 


ओबीसी समर्पित आयोगामध्ये मतभेद
राज्य शासनाकडून नेमण्यात आलेल्या बांटीया आयोगात सध्या मतभेद असल्याचं समोर आलं आहे. आयोगाचे अध्यक्ष बांटीया याचं म्हणण आहे की सध्या ओबीसी साठी केवळ सर्व्हे न करता एससी एसटी प्रवर्गाचा देखील सर्व्हे करण्यात यावा तर आयोगातील इतर सदस्यांच म्हणण आहे की हा आयोग ओबीसीसाठी तयार करण्यात आला आहे त्यामूळे केवळ ओबीसीची जनगणना करण्यात यावी. एकंदरीतच आयोगातील या मतभेदांमळे वेळेत इम्पिरिकल डेटा निर्माण होणारं का हा प्रश्न निर्माण झाला आहे.