मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


राज्यातील राजकीय नाट्य सुरू, आजचा दिवस महत्त्वाचा
महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला असून आज तिसऱ्या दिवशी नाराजी नाट्य सुरू रहाणार असल्याचं स्पष्ट आहे.  शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर राज्य निर्माण झालेला पेच कसा सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरेंनी भावनिक साद घालत समोर या मी राजीनामा तयार ठेवतो असं म्हंटलं. 


या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील गुवाहाटीला पोहोचले असून उदय सामंतही गुवाहाटीला पोहचत आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी काय घडामोडी घडणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.  
 
अनिल परब यांची तिसऱ्या दिवशीही चौकशी होणार
मागील दोन दिवसांपासून शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. मंगळवारी तब्बल 11 तास आणि बुधवारी जवळपास आठ तास ईडीने अनिल परब यांची चौकशी केली. त्यानंतरही त्यांची अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. गुरुवारी पुन्हा एकदा त्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. अनिल परब यांना ईडीने गुरुवारी सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवले आहे. ईडीने त्यांना काही कागदपत्रांची यादी दिली असून त्याची गुरुवारी पूर्तता करण्यास सांगितलेय.  दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून अनिल परब यांची चौकशी सुरु आहे. 


राष्ट्रवादीची महत्वाची बैठक
आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वाय बी चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. सध्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष वेट अँण्ड वॉच च्या भूमिकेत आहेत. एकनाथ शिंदेच्या भूमिकेनंतर शिवसेना पुढचं पाऊल काय उचलणार याकडे राष्ट्रवादीचे लक्ष आहे. या बैठकीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्व नेते आणि मंत्री सुद्धा सहभागी होणार आहेत.


नारायण राणेंच्या याचिकेवर आज तातडीने सुनावणी
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे. जुहू येथील अधीश बंगल्यावरील कारवाईविरोधात केलेलं अपील प्राधिकरणानं फेटाळलं. 24 जूनपर्यंत बंगल्यातील बेकायदेशीर बांधकामावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नारायण राणे आता या कारवाईवर दिलेली स्थगिती वाढवण्याची मागणी करणार आहेत. यावर आज तातडीची सुनावणी होणार आहे.


पंतप्रधान मोदी आजपासून ब्रिक्सच्या दोन दिवसीय बैठकीत सामिल होणार
ब्रिक्स (ब्राझिल, रशिया, ब्राझिल, चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांचे दोन दिवसीय परिषद आजपासून चीनमध्ये होणार आहे. या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हर्च्युअली उपस्थित राहणार आहे. ही परिषद भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सुरू होणार आहे.