मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मविआचा सावध पवित्रा
राज्यसभेत बसलेल्या फटक्यानंतर महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेतला आहे. शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री उमेदवारांचा कोटा ठरवणार असल्याची माहिती आहे. दगाफटका होऊ नये म्हणून मुख्यमंत्री कोटा ठरवणार आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही चमत्कार घडेल, पण तो कोणाच्या बाजून घडेल हे सोमवारी महाराष्ट्राची जनता पाहिल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी जी काही चूक झाली ती यावेळी होणार नाही, यावेळी उमेदवारांचा कोटा जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. मत बाद होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असंही ते म्हणाले.
नीरज चोप्राचा आणखी एक विक्रम, कुओर्तमध्ये पटकावलं सुवर्णपदक
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारताच्या नीरज चोप्राने पुन्हा एकदा कमाल दाखवली. फिनलंडमधील कुओर्तने गेम्समध्ये निरजने भाळापेकेत सुवर्णपदक जिंकलं. नीरजने शनिवारी येथे 86.69 मीटर विक्रमी भालाफेक केली.
आज शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरे करणार ऑनलाईन मार्गदर्शन
आज शिवसेनेचा 56 वा वर्धापनदिन आहे. या वर्षीही शिवसेनेचा वर्धापन दिन ऑनलाईन साजरा होणार आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीमुळे सर्व आमदार आणि महत्वाचे पदाधिकारी एकाच हॉटेलमध्ये आहे. त्यात कोरोना पुन्हा डोकंवर काढत असल्यामुळे हा मेळावा ऑनलाईन होणार असल्याचं म्हंटलं जातंय. राज्यसभेनंतर होणाऱ्या विधानपरिषद आणि महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर, मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कार्यकर्ते आणि जनतेला काय संबोधित करणार आहेत. उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजता वेस्टिन हॉटेलमध्ये आमदारांना संबोधित करणार आहे.
सोमवारी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज फोर सिजन हॉटेलमधील कॉग्रेसच्या बैठकीनंतर आमदारांचे मार्गदर्शन शिबीर होणार आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील काँग्रेस आमदारांचे मतदानाबाबत प्रशिक्षण घेणार आहे.
अग्निपथ योजनेविरोधात काँग्रेसचे दिल्लीत आंदोलन
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात कॉंग्रेस आज सत्याग्रह आंदोलन करणार आहे. सकाळी 11 वाजता दिल्लीतील जंतर मंतरवर हे आंदोलन होणार असून त्यामध्ये राहुल गांधी सहभागी होण्याची शक्यता आहे.