औरंगाबाद : राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehebub Shaikh) यांच्यावर काही दिवसांपूर्वी अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेल्या तरुणीने आता नवीन खुलासा केला आहे. भाजपच्या चित्रा वाघ (chitra wagh) आणि सुरेश धस यांच्या सांगण्यानुसार खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. एवढंच नाही तर याप्रकरणी तरुणीने औरंगाबादच्या जिंसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.    


काय म्हटलं आहे 'एफआयआर'मध्ये 


तरुणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादनुसार, नदमोद्दीन शेख याने लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर अत्याचार करून माझा व्हिडीओ बनवला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मी जसे सांगेन तसं केल्यास आपण खूप पैसे कमवू असे सांगितले. त्यानंतर सुरवातीला नाशिक येथे मेहबूब शेख यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल करायला सांगितली. मात्र, तेथील पोलिसांना खोटी तक्रार असल्याचा संशय आल्याने त्यांनी हाकलून दिले. त्यानंतर नदमोद्दीन शेख याच्या सांगण्यानुसार औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात मेहबूब शेख विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचं तरुणीने आपल्या जबाबात म्हटलं आहे. 


धस-चित्रा वाघ यांच्यावरही आरोप...


यावेळी तरुणीने एफआयआर'मध्ये चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप केले आहेत. मेहबूब शेख यांना खोट्या गुन्ह्यात फसवण्यासाठी नदमोद्दीन शेख याला सुरेश धस यांनी सांगितले होते,असा आरोप तिने केला आहे. सोबतच गुन्हा दाखल केल्यानंतर चित्रा वाघ यांच्यासोबत माझी भेट घालून देण्यात आली. त्यावेळी चित्रा वाघ यांना मला खोटी तक्रार द्यायला लावली असून मला यात पडायचं नसल्याचं तरुणीने म्हटलं आहे. मात्र आता तक्रार माघे घेतल्यास जेलमध्ये सडशील, त्यामुळे एफआयआरमध्ये जसं आहे तसेच बोलायचं असे चित्रा वाघ यांनी म्हटल्याचा आरोप तरूणीने केला आहे. त्यानंतर त्यांनी तरुणीचा एक व्हिडीओ बनवून माध्यमांशी कसे बोलायचं हे सांगितले, असे  तक्रारदार तरुणीने म्हटले आहे.


काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी अत्याचार केल्याचा आरोप औरंगाबाद शहरातील 29 वर्षीय तरुणीने केला आहे. या तरुणीचे बीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. तिच्या आरोपानुसार, "ती घरगुती शिकवणी घेते. त्या तरुणीला औरंगाबाद शहरातील बायपास परिसरात शिकवणी सुरु करायची असल्याने ती तिथे खोली भाड्याने घेण्यासाठी आली होती. त्याठिकाणी तिची भेट बीड जिल्ह्यातील शिरुर कासारमधील महबूब इब्राहिम शेख यांच्याशी झाली. त्यानंतर शिक्षण किती झाले असं विचारुन तुला मुंबईत नोकरी लावतो असे आमिष मेहबूब शेख यांनी दाखवलं. 14 नोव्हेंबर रोजी मुंबईला जाण्याचे कारण सांगत त्या तरुणीला जालना रोडवरील हॉटेल रामगिरी समोर बोलावले. रात्री नऊच्या सुमारास रामगिरी हॉटेलसमोर पोहोचले असता मेहबूब कार घेऊन त्या ठिकाणी उभे होते. तरुणीला मागील सीटवर बसवून गाडी सुरु केली. यानंतर वसंतराव नाईक कॉलेजजवळ निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुठे वाच्यता केली तर तुला सोडणार नाही असे म्हणून तिला कारमधून उतरवले, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या घटनेनंतर तरुणीच्या मावशीने धीर दिल्यानंतर तिने सिडको पोलीस ठाण्यात मेहबूब शेख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.