मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
आज दहावीचा निकाल, दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल लागणार
दहावीच्या परीक्षेला 16,38, 964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 8,89, 506 मुलं असून मुलींची संख्या 7, 49, 458 एवढी आहे. आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या वेबसाईटवरही विद्यार्थ्यांना जलद निकाल पाहता येणार आहे
नुपूर शर्मांविरोधात पुन्हा मुस्लिम आंदोलक रस्त्यावर उतरण्याची शक्यता
आजही नुपूर शर्मांच्या वक्तव्याचे पडसाद देशभर पडू शकतात. गेल्या शुक्रवारी जुम्म्याच्या नमाजानंतर देशभर मोर्चे निघाले होते. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. देशभर मौलवींनी शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, पोलिस सतर्क झालेत. आज नेमके काय पडसाद उमटतायेत हे पाहावं लागेल.
नुपूर शर्मा, जिंदालविरोधात वंचितचा अमन मोर्चा स्थगित
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मदनपुरा ते आझाद मैदान असा अमन मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, रात्री वंचितची गृहमंत्री वळसे पाटलांसोबत बैठक झाली. त्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय झालाय. मोहम्मद पैगंबर आणि इतर धर्मगुरूंचा अनादर करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यासाठी कायदा पारित करावा आणि या दोघांवर कारवाई करावी अशी मागणी आंबेडकरांनी केली. पोलिसांकडून आंबेडकरांना अटकेचं आश्वासन दिलंय. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलंय.
राहुल गांधींना आज चौथ्यांदा ईडी चौकशीसाठी
नॅशनल हेराल्ड मनी लॉड्रींग प्रकरणी सोमवार ते बुधवार सलग तीन दिवस राहुल गांधींची ईडीकडून चौकशी करण्यात आली. तिन्ही दिवस अनुक्रमे 8.30 तास, 11.30 तास आणि 10 तास चौकशी झाली. आता पुन्हा त्यांना आज चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. राहुल गांधींनी येत्या सोमवारी चौकशीला बोलवावं अशी ईडीकडे मागणी केली आहे. यावर अजून ईडीचा निर्णय आलेला नाही.
राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात देशभर काँग्रेसचं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
आज देशभर जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी काँग्रेसचं आंदोलन होणार आहे. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे कोल्हापूर, औरंगाबाद , नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली येथे काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबाबत काँग्रेसचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहे
देशमुख आणि मलिकांच्या मतदानाचा निर्णय आज येणार
आगामी विधान परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या दोन मतांचं भवितव्य आजच्या निकालावर अवलंबून आहे. कोणत्याही कैद्याला मतदानाचा अधिकार नाही, असा दावा करत ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी देशमुख आणि मलिकांच्या मागणीला जोरदार विरोध केला आहे. आज दुपारी 2.30 वाजता मुंबई उच्च न्यायालयात निकाल येणार आहे.
आज इतिहासात
1632 : मुघल बादशाह शहाजहान याची पत्नी मुमताज हिचे निधन
1756 : नवाब सिराजुद्दौलाने 50 हजार सैनिकांच्या मदतीने कोलकात्यावर हल्ला केला.
1933 : सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्यात आली
1991 : भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न हा राजीव गांधी यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.
2004 : मंगळावर पृथ्वीप्रमाणेच दगड सापडले.
2008 : 'तेजस' विमानाची पहिल्यांदाच यशस्वी चाचणी करण्यात आली