मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान
राज्याचे पावसाळी अधिवेशन बुधवार 17 ऑगस्ट पासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. खातेवाटपानंतरची ही पहिलीच बैठक असेल. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे.
विरोधी पक्षनेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद
महाराष्ट्र विधानमंडळाच्या 17 ऑगस्टपासून सुरु होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी विरोधी पक्षांचे प्रमुख नेतेही उपस्थित असतील.
नितीश कुमार-तेजस्वी यादव मंत्रिमंडळाचा विस्तार आज
बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या नितीश कुमार आणि तेजस्वी यादव सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार यांचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चिच झाला आहे. यानुसार राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) 15 मंत्री आणि संयुक्त जनता दल (JDU)चे 12 मंत्री असणार आहे. या शिवाय कॉंग्रेसच्या दोन, हम पार्टीच्या एक आणि अपक्ष एका आमदराला मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.
बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आरजेडीचे अवध बिहारी चौधरी यांच्या नावावर एकमत झाले आहे. अवध बिहारी चौधरी हे यादव समाजाचे आहे. नव्या मंत्रिमंडळात तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री आहेत. तेजस्वी यांचे भाऊ तेज प्रताप यादव हेही मंत्री असणार आहेत. आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांचे पुत्र सुधाकर सिंह यांची बिहारच्या मंत्रिमंडळात नियुक्ती होण्याची शक्यता आहे. यासोबतच महागठबंधन सरकारमध्ये मंत्रीपदासाठी डॉ. चंद्रशेखर यांच्या नावाचाही विचार केला जात आहे. डॉ. चंद्रशेखर हे मधेपुरा येथील यादव समाजाचे आहेत. डॉ. चंद्रशेखर हे यापूर्वी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.
अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे आज गुजरात राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज भूजमधील एका बैठकीमध्ये भाग घेणार असून त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी केजरीवाल मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.