Todays Headline : शिंदे गटातील आमदार आज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत. 17 तारखेला बाळासाहेबांच्या स्मृतिदिनादिवशीचा वाद टाळण्यासाठी आज अभिवादन करणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील बृहन्मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या वाढवण्याचा निर्णय रद्द करून ती पूर्वरत प्रभाग रचना करण्याच्या राज्य सरकारच्या नव्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं आव्हान देण्यात आलं आहे. या याचिकेवर आज तातडीनं सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं निश्चित केलं आहे. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत.
शिंदे गटातील आमदार बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार
शिंदे गटातील आमदार आज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत. 17 तारखेला बाळासाहेबांच्या स्मृतिदिनादिवशीचा वाद टाळण्यासाठी आज अभिवादन करणार आहेत. 17 नोव्हेंबरला होणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त आज विशेष ‘वारसा विचारांचा’ परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे.
कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते भाऊबीज मेळाव्याचे उदघाटन
भारतीय जनता पार्टी आणि सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटनेतर्फे भाऊबीज मेळाव्याचे उदघाटन कामगार मंत्री सुरेश खाडे करतील. या कार्यक्रमात आमदार आशिष शेलार, प्रसाद लाड, चित्रा वाघ उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रभाग संख्या वाढवण्याचा निर्णयाबाबत सुनावणी
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील बृहन्मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या वाढवण्याचा निर्णय रद्द करून ती पूर्वरत प्रभाग रचना करण्याच्या राज्य सरकारच्या नव्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं आव्हान देण्यात आलं आहे. या याचिकेवर आज तातडीनं सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं निश्चित केलं आहे.
मुंबई इंडस्ट्री मीट
राज्यपालांच्या उपस्थितीत कौशल्य क्षेत्रीय परिषद आणि रोजगार प्रदाते यांच्यासमवेत परिसंवाद आणि इंडस्ट्री मीट आयोजित करण्यात आली आहे, दरबार हॉल, राजभवन, दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होईल.
खासगी शाळांची पालक पोलखोल करणार
मुंबईमध्ये खासगी शाळेचा मनमानी कारभार सुरू असून शाळेची फी असो की इतर बाबींमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. खासगी शाळांचा बाबतीत प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे पालकांना त्रासाला सामोरे जावं लागतं आहे. याची पोलखोल आज काही पालक आणि संघटना करणार आहेत. आज पत्रकार परिषद होणार आहे.
मुंबईत काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅली
गजानन किर्तीकर यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, यासाठी काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलंय. खासदार गजानन किर्तीकर यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात प्रवेश केला आहे. किर्तीकर यांचा हा पक्षप्रवेश म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातील मतदारांचा अपमान आहे. त्यामुळे राजीनामा द्यावा, यासाठी काँग्रेस कमिटीतर्फे गोरेगाव वेस्ट ते गजानन कीर्तिकर यांच्या राहत्या घरापर्यंत बाईक रॅली काढण्यात येईल.