Pune Sppu News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (sppu) विद्यार्थी वसतिगृहातील खोल्यांची झडती घेण्यात आली. झडतीपूर्वी विद्यार्थिनींना कोणतीही पूर्वसूचना दिली नसल्याने विद्यार्थिनींची तारांबळ उडाली होती. 11 नोव्हेंबरच्या रात्री अचानक काही महिला अधिकाऱ्यांनी ही झडती घेतली. त्यात  किटली, शेगडी यांसारख्या इलेक्ट्रिक उपकरण जप्त करण्यात आले..


थंडीच्या दिवसात विद्यार्थिनी वसतिगृहात गरम पाणी बनवण्याची सोय नसल्याने विद्यार्थिनी गरम पाणी बनवण्यासाठी किटली, शेगडी यांसारख्या इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करतात. यापूर्वीही अनेकवेळा विद्यार्थिनी विद्यापीठाकडे गरम पाण्याच्या तक्रारी केल्या आहेत. मात्र विद्यापीठाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे विद्यार्थिनींनी स्वत: इलेक्ट्रिक उपकरण वापरुन त्यावर पाणी गरम करतात किंवा इंडक्शनचा वापर करतात. याची माहिती महिला अधिकाऱ्यांना मिळाली त्यानुसार त्यांनी झडती घेतली असता. त्यांच्याकडे असलेल्या वस्तू जप्त केल्या.


गरम पाण्यासाठी किंवा बाकी खाण्याचे पदार्थ करण्यासाठी विद्यापीठाकडून कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. मात्र रात्री अचानक छापा टाकून संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. अनेक मुलींचे लॉकर तुटलेले होते. अधिकाऱ्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपमानास्पद भाषा वापरली, असा विद्यार्थिनीचा आरोप आहे. विद्यार्थीनींकडे असलेले उपकरणं महागडे असल्याने अनेक मुली रात्री अंधारात भिंतीवर चढून आपापले साहित्य मित्रांकडे फेकून देताना दिसल्या. 


 
कॉमन किचनची मागणी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) यापूर्वीच प्रशासनाकडे “कॉमन किचन” ची मागणी केली आहे. थंडीच्या दिवसात विद्यार्थिनींना पाणी गरम करावे लागते. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन जोपर्यंत महिला विद्यार्थिनींसाठी वसतिगृहात सार्वजनिक स्वयंपाकघराची सुविधा उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत ही तपासणी तात्काळ थांबवावी, तसेच घेतलेले साहित्य त्वरित परत करावे, अशी मागणी त्यांनी केल्याचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याने सांगितलं आहे. 


...तर पुढील करावाई करा
कॉमन किचन आणि योग्य सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर मुलींना नोटीस देऊन साहित्य घरी पाठवण्यास सांगावे, त्यानंतर साहित्य आढळल्यास योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी अभाविपतर्फे कुलसचिव आणि प्रभारी कुलगुरूंकडे करण्यात आली. यावेळी अभाविपच्या शिष्टमंडळाने विद्यार्थी वसतिगृहात कोणताही गडबड होऊ न देता कायदेशीररित्या ही प्रक्रिया राबवू, अशी भूमिका घेतली आहे.  प्रशासन लवकरच सार्वजनिक सुविधा देणार आहे. मुलींनी अशी वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे धोकादायक आहे आणि त्यावर बंदी आहे. प्रशासन लवकरच मुलींना सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देईल, असे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे अभाविपच्या सदस्यांनी सांगितलं आहे. मात्र ही सुविधा न दिल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा अभाविपने प्रशासनाला दिला आहे.