मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू


राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक


राज्य मंत्रिमंडळाची आज अकरा वाजता मंत्रालयात बैठक आहे. गणेशोत्सवामुळे तब्बल दोन आठवडे मंत्रिमंडळ बैठक होऊ शकली नव्हती.  द्याच्या बैठकीमध्ये राज्य पुनर्वसन धोरणाला मंजुरी मिळणार आहे. तळेगाव दुर्घटना, माळीन दुर्घटना, तीवरे धरण फुटल्यानंतर मदत कशी करायची हा प्रश्न प्रशासनासमोर पडला होता.  त्यानंतर समिती गठीत करून पुनर्वसन धोरण राज्याचे नवीन निश्चित केल आहे. त्याला उद्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता मिळणार आहे


आज कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा


दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र झाले आहे. त्यामुळं पुढील पाच दिवसात महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसाचा  इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह आज आणि उद्या  सर्वत्र पाऊस होणार आहे. मराठवाड्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.


शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांच्यावर आज अंत्यसंस्कार 


शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचं निधन झालंय. मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यात  गोटेगाव जवळील झोटेश्वर धाम येथे वयाच्या 99 व्या वर्षी स्वामी स्वरूपानंद यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू अशी त्यांची ओळख होती. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे देश-विदेशात भक्त आहेत. शंकाराचार्य यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोन दिवसीय  गुजरात दौऱ्यावर


 पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने सत्ता काबिज केल्यानंतर आता आपला मोर्चा अन्य राज्यांकडे वळवला आहे. दुसऱ्या राज्यात पक्षाचे स्थान बळकट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोन दिवसीय  गुजरात दौऱ्यावर आहेत.  


बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट असोसिएशनशी संबंधित आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी


बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट असोसिएशनशी संबंधित आज (12 सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. बीसीसीआयनं त्यांच्या घटनेत दुरूस्ती करावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेच्या निकालावर विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा यांचा कार्यकाळ वाढणार की त्यांना पायउतार व्हावं लागणार? याबाबत निर्णय होईल