मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


गणपतीच्या मिरवणुकीत डीजे बंदी आणि आवाजाच्या मर्यादेवर सुनावणी
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजे बंदी आणि आवाजाच्या मर्यादेविरोधात दाखल याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावर काही वर्षांपूर्वी राज्य सरकारनं गणपती मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात वाजवल्या जाणाऱ्या डिजेवर बंदी आणली होती. त्या विरोधात या व्यवसायातील संघटनेनं हायकोर्टात आव्हान दिलं आहे. आगामी सणासुदीचा काळ पाहता या विषयावर हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निर्देश आज अपेक्षित आहे.


सायनच्या विद्यार्थ्यांची अवयवदानासंबंधी शपथ
जागतिक अवयवदान दिनानिमित्तानं सायनच्या एसआयईएस कॉलेजमध्ये 200 हून अधिक विद्यार्थी अवयवदानासंदर्भात शपथ घेणार आहेत. अवयवदानाचे महत्त्व वाढावा आणि जागरुकता निर्माण व्हावी यासाठी अनेक डॉक्टर्स देखील सहभागी होतील.


केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आज ग्रामीण सहकारी बँकेच्या राष्ट्रीय संमेलनाचे उद्धाटन करणार
दिल्लीमध्ये आज देशभरातील ग्रामीण सहकारी बँकांचे राष्ट्रीय संमेलन होणार असून त्याचे उद्धाटन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. सहकार मंत्रालय आणि राज्य सहकारी बँकांच्या राष्ट्रीय संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. 


स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचं स्नेहभोजन 
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केलं असून आज रात्री आठ वाजता ताज हॉटेलमध्ये त्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्नेहभोजनाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व मंत्री, महाधिवक्ता, न्यायाधीश, कुलगुरू ,तिनही दलाचे पदाधिकारी आणि राज्यातील महत्त्वाचे पदाधिकारी या स्नेहभोजनाला उपस्थित राहणार आहेत.