मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


कोकण, मुंबईत मान्सूनचं आगमन
मान्सूनचं कोकणात दमदार आगमन झालं आहे. मुंबईसह राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडला. काल कोकणात मुसळधार पाऊस झाला आहे. संपूर्ण मुंबई, उपनगरांमध्येही जोरदार पावसानं हजेरी लावली. पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांतही चांगला पाऊस झाला. 


आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन
आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत असून रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 12 जूनला तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. 11 आणि 12 तारखेला रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे.


लालबागच्या राजाचं गणेश मुहूर्त पूजन आज
भक्तांचे आराध्य दैवत लालबागच्या राजाचं गणेश मुहूर्त पूजन आज केलं जाणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे.


सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात 
आजपासून दोन दिवस सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाला पालघरमध्ये सुरुवात होणार आहे.  या संमेलनामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते होणार आहे. 


पश्चिम क्षेत्रीय परिषदेची आज बैठक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम क्षेत्रीय परिषदेची बैठक होणार आहे. दीवमध्ये सकाळी 10 वाजता ही बैठक होणार असून यासाठी गुजरात, महाराष्ट्र, गोवा येथील मुख्यमंत्री आणि दादरा, नगर हवेली, दमन, दीव येथील प्रशासक सहभागी होणार आहेत. सीमा, सुरक्षा, रस्ते, उद्योग, ऊर्जा याबाबत बैठक होणार आहे.