हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात येणाऱ्या आठ गावांमध्ये गॅबियन बंधाऱ्याच्या कामामध्ये निधी लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.


गॅबियन बंधाऱ्याच्या कामांमध्ये कोणतीही मागणी नसताना बनावट उपस्थिती पट तयार करून लाखो रुपयांचा निधी लाटण्याचा प्रयत्न औंढा पंचायत समितीमध्ये झाला होता. येथील गट विकास अधिकारी त्याचबरोबर तेथील तांत्रिक अधिकारी लेखा अधिकारी आणि संगणक ऑपरेटर या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश होता. या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या वतीने यावर चौकशी करण्यात आली आणि आता यामध्ये कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. यामध्ये जबाबदार दोन गट विकास अधिकारी त्याचबरोबर एक लेखा अधिकारी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवला जाणार असून यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.


हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात येणाऱ्या आठ गावांमध्ये गॅबियन बंधाऱ्याची कोणतेही मागणी नसताना कामे पूर्ण केल्याचे दाखवून लाखो रुपयांचा निधी लाटण्याचा प्रयत्न दोन गटविकास अधिकारी आणि अन्य काही कंत्राटी कर्मचारी यांनी केला होता. या प्रकरणात सर्वात अगोदर गोजेगाव येथील सरपंच खिल्लारे यांनी तक्रार दिल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचे बिंग फुटले होते. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करून चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये औंढा नागनाथ पंचायत समिती मध्ये कार्यरत असणारे तत्कालीन दोन गट विकास अधिकारी आणि एक लेखाधिकारी त्यांच्यावर कारवाई संदर्भात अहवाल विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवला जाणार आहे. तर कंत्राटी पध्द्तीने कर्तव्यावर असणारे पालक तांत्रिक अधिकारी संगणक ऑपरेटर त्याचबरोबर टेक्निकल असिस्टंट या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले जाणार आहेत .


गॅबियन बंधारा भ्रष्टाचार प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश 
औंढा नागनाथ तालुक्यातील आठ ग्रामपंचायत मध्ये पन्नास गॅबियन बंधाऱ्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या होत्या. यामध्ये एकूण 26 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे चौकशीच्या अहवालामध्ये निष्पन्न झाले आहे. औंढा पंचायत समितीचे तत्कालीन गट विकास अधिकारी यांनी या संपूर्ण भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्याचे निदर्शनास आले आहे. कारण या गॅबियन बंधाऱ्याच्या कामाची एकाही ग्रामपंचायतीने मागणी केलेली नसताना या कामांना मंजुरी देण्यात आली. मयत , दिव्यांग आणि वयोवृध्द नागरिकांच्या नावावर बनावट उपस्थिती पट तयार करून लाखो रुपयांचा निधी लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेळीच प्रशासनाने सावध भूमिका घेत कार्यवाहीचा निर्णय घेऊन बनावट कामगारांच्या खात्यात वर्ग केलेले पैसे थांबवण्यात आले आहेत. यात दोषी असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.