LIVE UPDATES | नांदेड : वारीस पठाण यांचा पुतळा जाळताना शिवसैनिक जखमी
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
21 Feb 2020 10:48 PM
नांदेड : वारीस पठाण यांचा पुतळा जाळताना एक शिवसैनिक पेटल्याची घटना नांदेडमध्ये घडली. नशीब बलवत्तर म्हणून शिवसैनिक थोडक्यात वाचला.
प्रहारचे जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहरात गोळीबार. कबूतरी जीन परिसरातील घटना. पुंडकर यांना एक गोळी लागली. अकोटच्या तालुका रूग्णालयात उपचारासाठी दाखल
एमआयएमचे नेते वारीस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे आता राजकीय परिणाम उमटत आहेत. नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर आज सायंकाळी शिवसेनेने वारीस पठाण याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. .पुतळ्याचे दहन करताना पुतळ्याचा भडका उडाला. या आगीने तिथे उपस्थित शिवसैनिक राजू मोरे यांच्या अंगावरील कपड्याने अचानक पेट घेतला. परंतु वेळीच आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला.
नागपूर : जिल्ह्यातील अदासा येथे 4 महिला मजुरांचा मातीच्या ढिगारा खाली दबून मृत्यू, तर 2 महिला मजूर जखमी. अदासा येथे लघु पाटबंधारे विभागाचे बंधारा( छोटा बांध )बांधला जात असताना आज दुपारी घडली घटना. तिथे महिला मजूर काम करताना मातीचा ढिगारा खाली कोसळला. त्याखाली 6 महिला मजूर दबल्या होत्या. त्यापैकी दोघींना वाचवण्यात यश आले, मात्र इतर चार महिला मजूर माती खाली दबून मृत्युमुखी पडल्या. पोलिसांनी कंत्राटदार आणि त्याच्या सुपरवायजर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व मृत महिला मध्यप्रदेशातील आहेत.
औरंगाबाद मनसे जिल्हाध्यक्ष गौतम आमराव याचं पक्षातून निलंबन करण्यात आलंय. पक्षादेश न पाळणे, पक्षविरोधी कारवाया केल्याने ही कारवाई केलीय. औरंगाबादच्या दौऱ्यात चुकीच्या बातम्या पुरवणं आणि पक्षविरोधी काम करणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं
देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय पुनर्वसन लवकरच होणार आहे की राज्यातील सत्ता केंद्रात ते पुन्हा परतणार आहे? संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या एका वक्तव्याने अशी चर्चा सुरू. देवेंद्रच्या भाग्यात विरोधी पक्ष नेता हे जास्त दिवसांचा विषय नाही. माजी मुख्यमंत्री हे पद ही त्यांच्या जीवनात अल्पायु आहे. हे दोन्ही ही पद अल्पायु आहे, असे सूचक वक्तव्य भैयाजी जोशी यांनी केले.
पंढरपूर : पंढरपूर शहरातील मुख्य रस्त्यावर पाठलाग करुन महिलेची छेड काढणाऱ्या मजनूला महिलेच्या पतीसह जमावाकडून चोप. गजबजलेल्या ठिकाणी हा मजनू पतीसोबत असलेल्या महिलेची छेड काढत होता. एवढ्यावरच न थांबता या रोमिओने या महिलेला मोबाईल नंबर देखील देण्याची मागणी केली. ही बाब त्या महिलेच्या लक्षात आल्यावर तिने पतीस सांगितल्यावर तिच्या पतीने त्या मजनूला पकडले. गोंधळ सुरु झाल्यावर जमाव जमा झाला. पतीसह जमावाने या मजनूला चांगलाच चोप दिला. माफी मागितल्यानंतर याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपी महिला डॉक्टरांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना हॉस्पिटलच्या आवारात प्रवेश देण्यास नायर रूग्णालय प्रशासनाचा नकार. प्रमुख साक्षीदार आणि इतर साक्षीदारांची सुरक्षा महत्त्वाची, या तिघांच्या परत येण्यानं सर्वत्र चुकीचा संदेश जाईल : नायर रूग्णालय, डॉ. गणेश शिंदे, नायर रूग्णालयातील स्त्रीरोग विभागाच्या प्रमुखांची हायकोर्टात माहिती. नायर रूग्णालयातून उर्वरित शिक्षण पूर्ण करू देण्याची आरोपींची मागणी हायकोर्टानं फेटाळली.
औसा तालुक्यात याकतपुर गावात 20-25 जणांना भगरीतून विषबाधा, 6 ग्रामीण रुग्णालयात दाखल तर बाकीचे खाजगी रुग्णालयात दाखल, एकाच दुकानातून विकत घेतली होती भगर
भाजपकडून उदयनराजे भोसले यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उदयनराजेंच्या योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. उदयनराजे पक्षात आले आणि पडले. त्यांचं योगदान काय असा सवाल काकडेंनी विचारला आहे. तसेच पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं काकडेंनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं आहे.
चोरीच्या संशयावरुन दोन तरुणांना बेदम मारहाण करत त्यांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याची घटना कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांचे मोबाईल गेल्या काही दिवसांपासून चोरीला जाऊ लागले होते. त्यामुळे व्यापारी चोरट्यांवर लक्ष ठेवून होते. त्यातच काल दोन तरुण एपीएमसी मार्केटमध्ये संशयास्पदरित्या फिरताना व्यापाऱ्यांना आढळले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी थेट त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अक्षरशः रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणांना मारहाण केल्यानंतर त्यांचे कपडे काढत त्यांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
एमआयएमचे खासदार वारिस पठाण यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. कर्नाटकातील गुलबर्गा इथे सीएएविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी ही कारवाई केली आहे.
फडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीपाठोपाठ आता जलयुक्त शिवार योजनेचीही चौकशी होणार आहे. तसे संकेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. जलयुक्त शिवार ही देवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षी योजना होती. या योजनेअंतर्गत जी कामं झाली आहेत ती चौकशीला पात्र असल्याचं जयंत पाटील म्हणाले. या योजनेत झालेली कामं अत्यंत तकलादू आहेत. काही कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पाटलांनी केला आहे. या योजनेची चौकशी होणार असली तरी राज्यातील जलसंधारणाची कामं सुरुच राहणार असल्याचंही जयंत पाटील यांनी आवर्जुन सांगितलं.
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर धावणारी पुणे-पनवेल-पुणे पॅसेंजर पुढील पाच दिवस धावणार नाही. मंकीहिल ते कर्जत दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून काम सुरु आहे. त्यामुळेच 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान ही रेल्वे रद्द करण्यात आली आहे. तर याच दरम्यान पुणे-भुसावळ-पुणे ही रेल्वे दौंड, मनमाड मार्गे वळवण्यात आलेली आहे. मंकीहिल ते कर्जत दरम्यान पावसाळ्यात दरड कोसळणे आणि डबे घसारण्याच्या घटनांचं सत्र सुरु असते, यावर तोडगा काढण्यासाठी जवळपास सहा महिन्यांपासून इथे युद्धपातळीवर काम सुरुये. ते जानेवारीत संपणे अपेक्षित होते मात्र अद्याप पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा येथून देवगडच्या दिशेने जाणाऱ्या मारुती अल्टो गाडीतून सुमारे 2 लाख 40 हजारांची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत अल्टो कारसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी वाहनचालक लक्ष्मीप्रसाद सखाराम मांजरेकरला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई मालवण कुंभारमाठ येथे केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधी यांना भेटणार आहे. आज दुपारी दीड ते दोनच्या सुमारास ही भेट होण्याची शक्यता आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्रंबकेश्वरच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या आहेत. या वर्षी पहिल्यांदाच महाशिवरात्रीला गर्भगृहात प्रवेश मिळणार नाही. पहाटे 5 ते 7 वाजेपर्यंत गर्भगृहात जाऊन दर्शन घेता येत होते, मात्र गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
अंबरनाथचं शिवमंदिर हे तब्बल 960 वर्ष जुनं असून हे हेमांडपंथी मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा उत्तम नमुना मानलं जातं. युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारशांच्या यादीतही या मंदिराचा समावेश आहे. त्यामुळे या मंदिराला अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्यामुळेच महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी इथे चार ते पाच लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. रात्री 12 वाजता मंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या पाटील परिवाराने पूजा केल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं, मात्र यंदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आलेला नाहीये. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिराचा परिसरही सजवण्यात आलाय. महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी अंबरनाथ शहरात ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी जत्राही भरते. त्यासाठीही लाखो लोक अंबरनाथला येत असतात.
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. महाशिवरात्रीचा आज देशभरात उत्साह, राज्यातील भगवान शंकराच्या मंदिरांना फुलांची सजावट, दर्शनासाठी भक्तांची पहाटेपासून गर्दी
2. उद्धव ठाकरे आज पंतप्रधान मोदी आणि सोनिया गांधींना भेटणार, मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलीच मोठी भेट, दोन्ही भेटींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष
3. सरकारी नोकरभरतीसाठी महापोर्टलद्वारे परीक्षा न घेण्याचा निर्णय, ठाकरे सरकारचा फडणवीसांना आणखी एक धक्का, नव्या पोर्टलसाठी निविदा मागवल्या
4 .15 कोटी 100 कोटींवर भारी , मुस्लिमांना चिथावणाऱ्या वारिस पठाणांच्या वक्त्तव्यावर चौफेर टीका, तर ओवेसींच्या व्यासपीठावर घोषणाबाजी करणाऱ्या तरुणीला रोखलं
5.. सरकारी तिजोरी रिकामी असताना मंत्र्यांसाठी 18 मजली इमारत उभारणार, आराखडा माझाच्या हाती, जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरु असल्याचा भाजपचा आरोप
6. मुंबई-मिरारोडमधील फाईव्ह स्टार हॉटेल्सना लष्कर-ए-तय्यबाच्या नावानं धमक्या, सात कोटींच्या खंडणीची मागणी, एटीएसकडून तपास सुरू