मुंबई: दक्षिण भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मंदोस (Cyclone Mandos) या चक्रीवादळाचं संकट घोंगावत असून तामिळनाडू, पद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच जळगाव दूध संघासाठी आज मतदान होणार आहे. यासह आज दिवसभरात कोणत्या घडामोडी घडणार आहेत त्यावर एक नजर टाकूयात.
मंदोस चक्रीवादळाचे संकट
दक्षिण भारतावर मंदोस चक्रीवादळाचं (Cyclone Mandos) संकट घोंगावत आहे. तामिळनाडू, पद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या राज्याला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. या तिन्ही राज्यात हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. तिन्ही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तुफान वाऱ्यासह समुद्र किनाऱ्यावर पाऊस कोसळत आहे. अस्मानी संकटामुळे प्रशासन सतर्क झालं असून एनडीआरएफसह इतर पथके तैणात करण्यात आली आहे. दक्षिण भारतामध्ये येणाऱ्या मंदोस चक्रीवादळाचा फटका शेजारी असणाऱ्या राज्यांना बसण्याची शक्यता आहे. कर्नाटक, केरळमधील हवामानात बदल झालाय. महाराष्ट्र, गुजरातमध्येही पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आमदार निलेश लंकेंच्या उपोषणाचा चौथा दिवस
राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील करंजी, चिचोंडी पाटील, सुपा, या ठिकाणी रास्ता रोको (Rasta Roko) आंदोलन करण्यात आलंय
जळगाव दूध संघासाठी आज मतदान
जळगाव दूध संघातील (Jalgaon Milk) वीस जागांसाठी आज सकाळी आठ ते सायंकाळी पाचवाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत एकनाथ खडसे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून या दूध संघाच्या निवडणुकीसाठी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या विरोधात कोल्हापुरात आंदोलन
कर्नाटक सरकारकडून सीमा भागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर भाजप नेत्याकडून वेळोवेळी होणाऱ्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधातही हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत.