On This Day In History : प्रत्येक दिवसाचे खास महत्त्व असते. इतिहासाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या घडामोडी आज 7 फेब्रुवारी रोजी घडल्या. महान तत्ववेता सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचा आज जन्मदिवस आहे. ऊर्दू शायर मिर्झा गालिब यांनी आजच्या दिवशी जगाचा निरोप घेतला होता. दलित पँथरचे संस्थापक आणि कवितेच्या माध्यमातून वंचितांवरील अन्यायाविरोधात व्यवस्थेविरोधात एल्गार पुकारणारे नामदेव  ढसाळ यांचा आज जन्मदिवस आहे. जाणून घेऊयात आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं होतं...



399: सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.


सॉक्रेटिस हा थोर शिक्षक, तत्ववेता म्हणून ओळखला जातो. अथेन्सच्या तरुणांना भ्रष्ट केल्याबद्दल आणि समाजात विचित्र देवांची ओळख करून दिल्याबद्दल सॉक्रेटिसला दोषी ठरवून हेमलॉक हे विष पिऊन मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जुन्या प्रथा परंपरा आणि ज्याला आपण दैवी शक्ती मानतो हे आपल्या राष्ट्रातलं आहे त्यामध्ये तो बदल करणे म्हणजे तो पाप करत असा ठपका सॉक्रेटिसवर ठेवण्यात आला होता. त्यातून सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सॉक्रेटिस प्लेटो अरेस्टोटल अलेकजेंडर ही गुरू शिष्य परंपरा आजतागायत प्रसिद्ध आहे.



1564 : खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचा जन्म


इटलीतील भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा आज जन्मदिवस. एखादा सिद्धान्त मांडायचा आणि केवळ वादविवाद करून तो प्रस्थापित करायचा अशी परंपरा तोपर्यंत होती. गॅलिलिओने मात्र आपला सिद्धान्त प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीनच पायंडा पाडला. खगोलशास्त्रात महत्त्वाचे संशोधन करणाऱ्यांमध्ये गॅलिलिओचे नाव अग्रस्थानी आहे. दुर्बिणीच्या माध्यमातून त्यांनी खगोल अभ्यास केला. त्यासाठी गॅलिलिओने खास दुर्बिण विकसित केली होती. त्यातून अज्ञात असलेले अनेक ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने अनेक शोध लागले.  गुरूभोवतीचे चंद्र बघून 'चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाहीत, त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचे कारण नाही, आणि कोपर्निकसचे म्हणणे बरोबर असले पाहिजे असे ठाम मत गॅलिलिओने व्यक्त केले. त्यांच्या या दाव्यानंतर सनातनी चर्च नाराज झाले. गॅलिलिओच्या पुस्तकावर पोपने बंदी घालून त्याला चौकशी समितीसमोर खेचले होते. 



1869: ऊर्दू शायर मिर्झा गालिब यांचे निधन


सुप्रसिद्ध फारसी आणि ऊर्दू कवी मिर्झा असुल्लाखान गालिब यांचे निधन. मिर्झा गालिब यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्वज्ञान होते. वयाच्या 11 व्या वर्षांपासून गालिब शेर लिहित होते. आपल्या शायरीच्या माध्यमातून मिर्झा गालिब यांनी जीवनातील झळा मांडल्या. गालिब यांनी कधीही राजे, उमराव यांच्या दरबारी फारशी हजेरी लावली नाही. कधीही उद्योग-धंदा न करणाऱ्या मिर्झा गालिब हे मित्र, नातेवाईकांच्या मदतीने राहत होते. गालिबच्या काव्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता.



1879: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी 


अमेरिकन सुप्रीम कोर्टात महिला वकिलांना खटले लढवण्यासाठी परवानगी देणाऱ्या कायद्यावर राष्ट्राध्यक्ष रुदरफोर्ड बी. हेस यांनी एका नवीन कायद्यावर स्वाक्षरी केली. त्यामुळे अमेरिकेत महिला वकिलांनादेखील सर्वोच्च न्यायालयाच्या बारचे सदस्य म्हणून प्रवेश मिळाला. 



1934: स्विस संगणक शास्त्रज्ञ निकलॉस एमिल विर्थ याचा जन्म


स्विस संगणक शास्त्रज्ञ निकलॉस विर्थ यांचा जन्म. त्यांनी पास्कलसह अनेक प्रोग्रामिंग भाषांची रचना केली. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधील ते एक महत्त्वाचे संशोधक आहेत. कॉम्प्युटर सायन्स मधील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणाऱ्या ट्युरिंग पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला होता. 



1949: महाकवी नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म


दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे, दलित पँथर चळवळीचे संस्थापक नेते, महाकवी नामदेव ढसाळ यांचा आज स्मृतीदिन. नामदेव ढसाळ यांच्या कविता, लेख हे साहित्य विश्वात महत्त्वाचे समजले जातात. नामदेव ढसाळ यांच्या कवितेची विशिष्ट शैली होती. साहित्य आणि चळवळीत ढसाळ अग्रसेर होते. त्यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडली.



1980: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य, स्वातंत्र्यसैनिक कॉ. मिरजकर यांचे निधन


भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) या कामगार संघटनेचे अध्यक्ष राहिलेले कॉम्रेड एस. एस. मिरजकर यांचे निधन झाले. भारतात कम्युनिस्ट पक्षाची सुरुवात करणाऱ्या काही मोजक्या नेत्यांपैकी ते एक होते. स्वातंत्र्य लढ्यात गाजलेल्या मिरत कट खटल्यात ते दोषी आढळले होते. त्यानंतरही मिरजकर हे स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय होते. मिरजकर हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. 1958 मध्ये ते मुंबईचे महापौर होते. 



1988:  नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड फाइनमन यांचे निधन


अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रिचर्ड फाइनमन यांना क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले होते. अतिशीत हेलिअमच्या सुपरफ्लुईडिटी तत्त्वाची भौतिकी तसेच पदार्थविज्ञानातील सर्वांत महत्त्वपूर्ण असे पार्टन मॉडेल त्यांनी सुचवले.