15 February Headlines : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. कालच्या चार तासापेक्षा जास्त झालेल्या युक्तिवादानंतर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याशिवाय प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची आज टिळक भवनमध्ये दुपारी दोन वाजता महत्वाची बैठक आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या होमग्राऊंडवर आज दोन सभा होणार आहेत.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. कालच्या चार तासापेक्षा जास्त झालेल्या युक्तिवादानंतर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. काल ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी यांनी चार तासांपेक्षा जास्त युक्तिवाद केला. कोर्टाची वेळी 4 वाजता संपल्यामुळं सुनावणी दुसऱ्या दिवशीवर ढकलली गेली होती. आज शिंदे गटाचे वकील हरिष साळवे युक्तिवाद करतील.
प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची मुंबईतील टिळक भवनमध्ये बैठक
प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची आज टिळक भवनमध्ये दुपारी दोन वाजता महत्वाची बैठक आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. यावेळी विधान परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार व भारत यात्रींचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, माजी मंत्री, आमदार व जिल्हाध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहेत.
ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन सभा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या होमग्राऊंडवर आज दोन सभा होणार आहेत. पहिली सभा कल्याणमध्ये तर दुसरी सभा उल्हासनगरमध्ये होणार आहे. सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्र्यांचा कल्याणमध्ये कार्यक्रम होईल.
राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक
आगामी अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षातील सर्व आमदारांची बैठक आज सकाळी 10 वाजता विधान भवनात होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित असतील. आगामी अर्थ संकल्पात विरोधकांना धारेवर धरण्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक असेल. 10 दिवसांपूर्वी अशीच एक बैठक पार पडली होती त्यामध्ये महागाई, भ्रष्टाचार यासोबतच अदानी समुहामुळे झालेली वाताहत यावर सरकारला धारेवर धरण्याच निश्चित करण्यात आलं होतं.
पुरंदर तालुक्यातील वीर येथील मस्कोबाच्या यात्रेची सांगता
पुरंदर तालुक्यातील वीर येथील मस्कोबाच्या यात्रेची सांगता होणार आहे. मारामारीने म्हणजेच रंगाची शिंपण करून या यात्रेची सांगता होते. ही रंगांची शिंपण बघण्यासाठी राज्यभरातून लोक दाखल होत असतात. दुपारी 12 वाजता या रंगाची शिंपण करून यात्रेची सांगता होणार आहे... देवावर रंगाची शिंपण केली जाते, यानंतर तो रंग भाविकांवर सिंपडला जातो. तो रंग अंगावर घेण्यासाठी जी गडबड गोंधळ होतो त्यालाच मारामारी म्हणतात.
पीएफआय वरील बंदीसंदर्भात आजपासून लवादापुढे सुनावणी
पीएफआय वरील बंदीसंदर्भात आजपासून लवादापुढे सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात निवृत्त न्यायमूर्ती दिनेश शर्मा यांच्यापुढे सुनावणी चालणार आहे. राज्य सरकारनं एखाद्या संस्थेवर बंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना नियमानुसार आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. तर राज्य सरकारही बंदी का आवश्यक यावर बाजू मांडणार.
आमदार बच्चू कडूंविरोधात दाखल खटल्याची मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी
मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात आमदार बच्चू कडूंविरोधात दाखल खटल्याची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी आहे.