औरंगाबाद / कोल्हापूर : पाकिस्तानी हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप जाधव यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी केळगावात अंत्यसंस्कार करण्यात आले. जाधव यांच्या गावी त्यांचं पार्थिव येताच घरच्यांचा अश्रूंचा बांध फुटला. 'संदीप जाधव अमर रहे' या गावकऱ्यांच्या घोषणांनी केळगावचा परिसर दणाणून निघाला.
शहीद जवान संदीप जाधव यांचं पार्थिव काल औरंगाबादमध्ये आणण्यात आलं होतं. रात्री त्यांचं पार्थिव मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
दरम्यान शहीद संदीप जाधव यांच्या मूळगावी केळगावात त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतून मोठी गर्दी करण्यात आली होती. दुर्दैव म्हणजे मुलाच्या वाढदिवशीच वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ जाधव कुटुंबीयांवर ओढावली.
तर दुसरीकडे कोल्हापूरचे शहीद जवान श्रावण माने यांच्या पार्थिवावरही आज अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रावण माने यांच्यावरही त्यांच्या मूळगावी गोगवे इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं पार्थिव गोगवे गावात दाखल होताच त्यांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला. माने यांचं पार्थिव आणण्याआधी कोल्हापुरात त्यांना मानवंदना देण्यात आली. अवघ्या 25 व्या वर्षी श्रावण माने शहीद झाले आहेत.
पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने नियंत्रण रेषेवर गुरुवारी रात्री भ्याड हल्ला केला होता. ज्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाले.
औरंगाबादचे रहिवासी असलेले नाईक संदीप जाधव आणि कोल्हापूरचे रहिवासी असलेले शिपाई श्रावण बाळकू माने हल्ल्यात शहीद झाले. 35 वर्षीय संदीप जाधव गेली 15 वर्ष लष्कराच्या सेवेत होते, तर 25 वर्षीय माने 4 वर्षांपूर्वीच सेवेत रुजू झाले होते.
संबंधित बातम्या:
पाक लष्कराच्या हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद