सोलापूर : खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे तिवरे धरण फुटलं, असं ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांचं मत असल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण या घटनेला जबाबदार नसल्याचं सांगत सावंत यांनी चव्हाणांची पाठराखण केली. तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेनंतर आतापर्यंत वीस जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर काही जण अद्यापही बेपत्ता आहेत.


पुण्यात मुठा नदीच्या कालव्याची भिंत फुटून झालेल्या अपघाताचं खापरही त्यावेळी उंदीर आणि खेकड्यांवरच फोडण्यात आलं होतं. त्या प्रकाराची पुनरावृत्ती यावेळी होताना दिसत आहे.

धरणफुटीच्या घटनेला 48 तास उलटून गेल्यानंतरही अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही? या प्रश्नावर 'गुन्हा कोणावर दाखल करणार?' असा उलटा प्रश्न तानाजी सावंतांनी केला. गुन्हा दाखल होण्यास 2-3 महिने लागतील, अशी माहिती त्यांनी दिली. समिती नेमलेली असून चौकशी झाल्यावर आरोप निश्चित होतील, असं ते म्हणाले.

खेकड्याने भिंत पोखरल्याची थेअरी शिवसेना आमदाराला वाचवण्यासाठी नाही, मला जे ग्रामस्थांनी सांगितलं, तेच मी सांगत असल्याची पुस्तीही तानाजी सावंत यांनी जोडली. 'माझं आमदार सदानंद चव्हाण यांच्याशी बोललो आहे. त्यांचं म्हणणं आहे अचानक पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे हे झालं. 2004 ला हॅन्डओव्हर झाल्याने चव्हाणांचा यात संबंध नाही' असं म्हणत सावंतांनी त्यांची पाठराखण केली.

आमचा पक्ष सेन्सिटिव्ह असल्याने सगळ्यात आधी आम्ही पोहचलो. आम्ही कोणाला पाठीशी घालणार नाही, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

सदानंद चव्हाण हेच तिवरे धरणाचे ठेकेदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. नैतिक जबाबदारी घेऊन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधीपक्षाने केली. चिपळूणमधील तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत गावकऱ्यांनी तक्रार केल्याची कबुली महाजन यांनी दिली होती.

तिवरे धरण हे दापोली लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येतं. 2000 साली या धरणांचं बांधकाम पूर्ण झालं. 20 लाख क्युबिक मीटर पाणीसाठा मावेल एवढी या धरणाची क्षमता आहे. परंतु मागील काही वर्षात या धरणाची दुरुस्ती झालेली नाही. अनेक गावांना या धरणाच्या पाण्याचा पिण्यासह शेतीसाठी उपयोग होतो. दोन वर्षांपूर्वी धरणाला गळती लागली होती, पण गेल्या वर्षी गळतीत वाढ झाली.