अमरावती : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती, अपक्ष आमदार रवी राणा यांनी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अमरावती जिल्हा आणि विदर्भाच्या विकासावर तिघांमध्ये 47 मिनिटं चर्चा रंगली.


अमरावती जिल्ह्याच्या विभाजनासोबत मतदारसंघातल्या 12 मागण्या नवनीत राणा यांनी नरेंद्र मोदींसमोर मांडल्या. यावेळी, 'माझा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहील', असं उत्तर मोदींनी दिलं.

गेल्या आठवड्यात नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने दोघं भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘बदल होत असतात’ अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केल्यामुळे त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांनी जोरही धरला. आता थेट पंतप्रधान मोदींसोबत भेट झाल्याने पुन्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नवनीत राणा यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात शिवसेनेकडून तीन वेळा खासदार राहिलेल्या आनंदराव अडसूळ यांना पराभूत करत संसद गाठली. या निवडणुकीत नवनीत यांना काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने पाठिंबा दिला होता.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याने भाजपमध्ये प्रवेश केल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका बसू शकतो. मात्र सध्या तरी आपण कुठल्या पक्षात जात नसून, अपक्षच राहणार असल्याची भूमिका या दाम्पत्याने मांडली.

2014 मधील लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली होती. मात्र आनंदराव अडसूळ यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर नवनीत राणा यांनी न थांबता गेली पाच वर्ष अमरावती जिल्हा पिंजून काढला आणि आपलं काम सुरु ठेवलं होतं. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीने युवा स्वाभिमान पक्षाला महाआघाडीत सामावून घेतलं.

नवनीत कौर राणा यांनी दाक्षिणात्य सिनेमांमध्ये अभिनेत्री म्हणूनही आपली ओळख निर्माण केली होती. अमरावतीत आमदार रवी राणा यांनी  2011 साली रेकॉर्ड ब्रेक सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी स्वत: रवी राणा आणि नवनीत कौर हे विवाहबद्ध झाले होते. यावेळी तब्बल 3100 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला होता.