Gadchiroli Tiger Poaching : गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागात वाघिणीची शिकार झाल्याचे उघड झाले आहे. वाघिणीची शिकार करण्यासाठी उच्चदाब वीज वाहिनीचा वापर करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. वाघिणीचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला. मात्र, नखे आणि शीर नसल्याचे आढळून आले आहे. वाघिणीला लक्ष्य करून ठार मारल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. वनविभागाने पंचनामा केल्यानंतर वाघिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
अहेरी वनक्षेत्रात मोसम गावातील वनकक्ष क्र. 615 मध्ये ही घटना घडली. या भागात मोठी दुर्गंधी पसरली होती. ही दुर्गंधी पसरण्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न वन कर्मचाऱ्यांनी सुरू केला होता. त्यावेळी ही बाब समोर आली. वन कर्मचाऱ्यांची शोध मोहीम सुरू असताना त्यांना काही वीजतारा आढळून आल्या. घटनास्थळाच्या आसपास 300 मीटर अंतरावर उच्चदाब वीजवाहिनी आहे. सुमारे 1 किलोमीटरची तार वापरून तारजाळे पसरवून ही शिकार केली असल्याचे प्राथमिक पुरावे मिळाले असल्याचे वनअधिकाऱ्यांनी सांगितले. वीजप्रवाहाचा धक्का लागून वाघ मृत झाल्यावर त्याला जमिनीत पुरले. मृत वाघिणीची नखे आणि शीर मात्र बेपत्ता आहे. या वाघिणीचा मृत्यू 7 ते10 दिवस आधीच झाला असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वनविभागाने पुरलेला वाघीण मृतदेह नियमानुसार खणून काढत पंचनामा करून त्याचे दहन केले. वनविभाग आरोपींचा शोध घेत आहे. दरम्यान, काही दिवसांपासून या भागात वाघीण असून ग्रामस्थांनी सावध रहावे अशी दवंडी देण्यात येत होती.
दरम्यान, महाराष्ट्रात सहा महिन्यांत 23 वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जानेवारी 2021 ते जुलै 2021 या कालावधीत राज्यात 23 वाघांचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, 23 वाघांपैकी 15 वाघांचा नैसर्गिक कारणानं, चौघांचा विषाच्या वापरामुळं, दोघांचा शिकारीमुळं, एका वाघाचा रेल्वे अपघातामुळं आणि एकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची नोंद आहे. या 23 वाघांपैकी 15 प्रौढ वाघ होते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha