बीड : खासदार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना झालेल्या मारहाणप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. दादासाहेब मुंडे यांना मारहाण झाली त्यावेळी हे तीन पोलीस कर्मचारी त्याठिकाणी उपस्थित होते. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई न केल्यानं त्यांच्यावर नव्हती.
याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेचा काँग्रेसने जाहीर निषेध केला असून या प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करणार आहे. तसेच 24 तासात आरोपींना अटक केले नाही तर महाराष्ट्रात मोठं आंदोलन केलं जाईल, असा इशारा कॉंग्रेसचे नेते रवींद्र दळवी यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला दिला आहे. बीडमध्ये आज कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कालच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्याठिकाणी ते बोलत होते.
काय आहे प्रकरण?
काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्या लोकसभा उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवला होता. त्याबाबत दादासाहेब यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती. मात्र या तक्रारीनंतर पंकजा मुंडे समर्थकांनी दादासाहेब यांना मारहाण केली आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच हा मारहाणीचा प्रकार केली.
प्रीतम मुंडे यांची मतदार नोंदणीमध्ये दोन ठिकाणी नावे आहेत. प्रीतम मुंडे यांनी उमेदवारी अर्जात त्याची माहिती दिलेली नसल्याचा दादासाहेब यांचा दावा केला होता. तसेच प्रीतम यांच्यावर पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याची नोंद आहे. या गुन्ह्याबाबतची माहिती त्यांनी उमेदवारी अर्जात दिलेली नाही.
प्रीतम मुंडे यांनी त्यांच्या मालमत्तेवरील नावात स्वतःच्या नावासमोर पतीचे नाव लावले आहे. परंतु केवळ मतं मिळवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी स्वतःच्या नावासमोर वडीलांचे नाव लावले आहे, असा आरोप दादासाहेब मुंडे यांनी केला होता.