Gadchiroli News: महाराष्ट्र दिनाच्या पूर्वदिनी गडचिरोली पोलिसांना मोठं यश मिळाले. भामरागड तालुक्यात झालेल्या पोलीस तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये नक्षली दलमच्या महत्त्वाच्या कॅडरचा समावेश आहे.
पेरिमिली आणि अहेरी दलम हे मनेराजाराम ते पेरिमिली पोलीस मदत केंद्रा दरम्यान कडमारा येथील जंगल परिसरात नक्षली तळ ठोकून असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे जंगल परिसरात शोध मोहीम राबवण्यासाठी उप पोलीस मुख्यालय प्राणहिता अहेरी येथून दोन सी-60 पथक नक्षल ऑपरेशनसाठी पाठवण्यात आले होते.
पोलिसांची ही शोध मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी सी-60 च्या पथकावर गोळीबार केला. या गोळीबाराच्या प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार सुरू केला. ही चकमक सुमारे रात्री 8 वाजताच्या दरम्यान घडली. गोळीबार थांबल्यानंतर शोध मोहिमेदरम्यान शस्त्रे आणि इतर साहित्यासह तीन नक्षलवादी पुरुषांचे मृतदेह सापडले आहेत.
पेरिमिली दलमचा कमांडर बिटलू मडावी यांचा एक मृतदेह आणि इतर दोन मृतदेह पेरिमिली दलमच्या वासू आणि अहेरी दलमच्या श्रीकांत यांचे असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे. प्राथमिक माहिती अशी आहे की वासू यांना पेरिमिली एलओएसच्या 2023 मध्ये डीव्हीसीएम पदावर आणि श्रीकांत यांना उपपदावर पदोन्नती देण्यात आली होती. अहेरी LOS चे कमांडर याची पडताळणी केली जात आहे.
बिटलू मडावी याने यावर्षी 9 मार्च रोजी पोलीस भरतीत गेलेल्या साईनाथ नरोटे याची पोलीस खबरी असल्याचे कारण देऊन हत्या केली होती. हत्येसह फेब्रुवारी/मार्च 2023 मध्ये विसामुंडी आणि आलेंगा येथे रस्ते बांधकाम उपकरणांची जाळपोळ करण्याच्या दोन घटनांमध्ये मुख्य आरोपी होता. चकमक घडलेल्या घटनास्थळी अजून ही सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी हल्ल्यात 11 जवान ठार झाले होते. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील गडचिरोलीत अलर्ट जारी करण्यात आला होता. छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या भागात अधिक खबरदारी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले होते.
छत्तीसगडमधील दंतेवाडात हल्ला
माओवादी मोठ्या प्रमाणावर असल्याच्या माहितीवरून दंतेवाडा येथून डीआरजी जवानांना रवाना करण्यात आले. यानंतर सर्व जवान तेथून परतत होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी अरणपूर रस्त्यावरील पालनार येथे स्फोट घडवला. हे सैनिक खासगी वाहनाने निघाले होते. या हल्ल्यात एका नागरिकाचाही मृत्यू झाला. तो या खाजगी वाहनाचा चालक होता. हल्ल्यानंतर जवानांकडूनही प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली. यात काही नक्षलवादीही जखमी झाल्याची माहिती आहे.