मुंबई : सरसकट मोफत लसीकरणावरुन ठाकरे सरकारमधील मंत्र्यांमध्ये मतभिन्नता दिसून येत आहे. काँग्रेस मोफत लसीकरणासाठी आग्रही आहे. पण या संदर्भातील निर्णय निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा. श्रेयवादासाठी घोषणा करणं योग्य नसल्याचं म्हणत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. दरम्यान, काल राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी 1 मेपासून महाराष्ट्रात मोफत लस देण्याची घोषणा केली होती. त्यावरुन आता राज्य सरकारमध्ये मतमतांतरं दिसून येत आहेत.
राज्यातील मोफत लसीकरणाबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, "मोफत लसीकरणासाठी आम्ही आग्रही आहोत. यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा केली आहे. फक्त याबाबत श्रेयवादाची लढाई योग्य नाही. यासंदर्भात आग्रह धरणं हे आमचं काम आहे. पण निर्णय मात्र माननिय मुख्यमंत्री महोदयांनीच जाहीर केला पाहिजे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "अद्याप या विषयी मंत्रिमंडळात चर्चा सुरु आहे. त्याबाबत विचार केला जात आहे. पण त्यापूर्वीच श्रेय घेण्यासाठी आधीच निर्णय जाहीर करणं योग्य नाही, अशीच काँग्रेसची भूमिका आहे."
मोफत लसीकरणाबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा : बाळासाहेब थोरात
मोफत लसीबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोफत लसीकरणाचा आग्रह धरला होता, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. यात श्रेयवादाची लढाई सुरु आहे, ती योग्य नाही. लसीकरणाबाबत चर्चा सुरु असून मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर केला पाहिजे, अशी भूमिका काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडली. तसेच केवळ श्रेयासाठी घोषणा करणं योग्य नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी राष्ट्रवादीला लगावला.
पाहा व्हिडीओ : Free vaccination | श्रेयवादासाठी घोषणा करणं योग्य नाही : बाळासाहेब थोरात
लसीकरणासाठी धोरण निश्चित करावं लागेल : बाळासाहेब थोरात
"येत्या 1 मे पासून देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण होणार आहे. त्यामुळे लसीकरणासाठी गर्दी वाढण्याची शक्यात आहे. यामुळे गोंधळ होऊन कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. मी याबाबत मुख्य सचिवांसोबत चर्चा केली आहे. येत्या दोन दिवसांत धोरण निश्चित केलं जाईल. 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणावेळी देखील गोंधळ झाला होता, त्यामुळे आता 18 वर्षावरील देताना धोरण ठरवावं लागेल.", असंही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, केंद्र सरकारने 1 मेपासून देशभरातील 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. यादरम्यान देशभरातील अनेक राज्यांनी मोफत लसीकरण केलं जाईल, असं जाहीर केलं आहे. परंतु, महाराष्ट्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशातच राज्य पातळीवर कोणताही निर्णय झालेला नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र मोफत लसीकरणाची घोषणा केली. दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील यासंदर्भात ट्वीट केलं होतं. पण नंतर त्यांनी हे ट्वीट डिलीट केलं. दरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावरुन नाराजी जाहीर करत नाव न घेता टोला लगावला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :