नांदेड : कोविड महामारीच्या काळात एकीकडे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कमी करण्यासाठी डॉक्टर्स कोरोना योद्धे दिवस रात्र रुग्णांची सेवा करत आहेत. महामारीचं संकट परतवून लावण्यासाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावत आहेत. पण काही रुग्णालयांत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. नांदेडमध्येही असाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. नांदेड शहरातील गोदावरी हॉस्पिटलमध्ये बिल वाढविण्यासाठी कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतरही त्याच्यावर उपचार सुरु ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 


नांदेड येथील सिडको भागातील विणकर कॉलनीत राहणारे शिक्षक अंकलेश पवार यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ते महिन्याभरापासून नांदेड येथील कोरोना रुग्णालयात उपचार घेत होते. पण डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अंकलेश पवार यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. रेमडेसिवीरची गरज असतानाही त्यांना ते इंजेक्शन दिलं गेलं नाही, तसेच इतर योग्य उपचारही करण्यात आले नाहीत. त्याऐवजी डॉक्टरांकडून अव्वाच्यासव्वा बिल आकारलं जात होत. वारंवार बिलाची मागणीही रुग्णालय प्रशासनाकडून केली जात होती. 


साधारणतः महिन्याभराच्या उपचारानंतर 21 एप्रिल रोजी अंकलेश पवार यांचा कोरोनानं मृत्यू झाला. परंतु, त्यांचा मृत्यू झाल्याची बाब रुग्णालयाकडून लपवून ठेवण्यात आली आणि 24 तारखेला त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यावर 21 तारिख असल्याचं मृत शिक्षकाच्या पत्नीच्या निदर्शनास आलं. त्यावेळी ही संतापजनक घटना समोर आली. याप्रकरणी मृत शिक्षक अंकलेश पवार यांच्या पत्नी शुभांगी पवार यांनी न्यायालयात पतीच्या मृतदेहासोबत झालेल्या अवमानाची दाद मागितली. अशातच नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाने गोदावरी हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस स्थानकात गोदावरी हॉस्पिटलमधील डॉक्टरांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. परंतु, रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेले सर्व आरोप गोदावरी रुग्णालयानं फेटाळून लावले आहेत. लिहिताना तारिख चुकल्याचा दावा रुग्णालयातील डॉक्टरांनी केला आहे. याप्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनीही दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. 


रुग्णालय प्रशासनानं पैसे उकळण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला होता. अंकलेश पवार यांचा मृत्यूचा दाखला मिळाल्यानंतर रुग्णालयानं पवार यांच्या मृत्यूची बाब तीन दिवस लपवून ठेवल्याचं उघड झालं. तरीही रुग्णालयाने पवार कुटुंबाकडून 1 लाख 40 हजार रुपये बिल स्वरूपात आकारले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जातोय. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :