सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग इथे हजारो लोकांनी रात्र जागून काढली. मागील अडीचशे वर्षांपासूनची ही परंपरा गावकरी अद्यापही जपत आहेत. वळसंग इथलं ग्रामदैवत चौडेश्वरी देवीच्या यात्रेतील मुख्य आकर्षण असलेला बाळबट्टल सोहळा काल (29 मे) रात्री साजरा झाला. या दिवशी संपूर्ण गावासह आसपासच्या जिल्ह्यातील हजारो भाविक वळसंग इथे दाखल झाले होते. पाच दिवसांच्या चौडेश्वरी देवीच्या यात्रेला शुक्रवारी (27 मे) सुरुवात झाली. यात्रेच्या तिसऱ्या 'बाळबट्टल' सोहळा पार पडला.


काय आहे अख्यायिका?
कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील वळसंग हे गाव आहे. सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी वीर नावाच्या मुलाने कर्नाटकातील माशाळ इथल्या मंदिरातून बट्टल (चांदीची वाटी) लुटून आणली. हे माशाळच्या लोकांना समजताच त्यांनी नंग्या तलवारी हातात घेऊन घोडा, रेडा, बैलगाड्या आणि मिळेल त्या साधनांचा वापर करत बालकाला पकडण्यासाठी पाठलाग सुरु केला. यादरम्यान बालकाला वाटेत असंख्य अडचणी आल्या. काटे टोचून पाय रक्तबंबाळ झाले. अडथळे आल्यावर तो धडपडला, पण थांबला नाही. आईला दिलेला शब्द पाळण्यासाठी चांदीची वाटी घेऊनच वळसंगमध्ये दाखल झाला. गावाभोवती पूर्ण संरक्षक भितं असल्यामुळे त्याला गावात प्रवेश करता आला नाही. तो शेवटी वेशीत आला. द्वारपालाला विनंती केली, पण त्या चौकीदाराने नियम तोडण्यास मनाई केली. विनंती करुनही काहीच उपयोग न झाल्याने छोट्याशा खिडकीतून तो 'बट्टल' वेशीच्या आत टाकून दिंडूरच्या दिशेने धावू लागला. माशाळच्या लोकांना हा बालक दिसताच त्यांनी 'बट्टल' घेण्याच्या प्रयत्नात पुन्हा त्याचा पाठलाग सुरु केला. तो दिंडूर रस्त्यावरील मड्डी बसवण्णा इथे थांबला. आजही त्याठिकाणी बालकाची  समाधी आहे. त्याच्या हातात बट्टल नसल्याने निराश झालेले माशाळचे लोक रिकाम्या हाताने परतले. ही घटना माशाळकरांना दु:खाची होती, तर वळसंग ग्रामस्थांसाठी उत्साहाची होती. त्यामुळे त्यांनी हा दिवस वळसंगमध्ये रामलिंग चौडेश्वरी यात्रेच्या रुपात साजरा केला. ती परंपरा आजही कायम असल्याचे इथले गावकरी सांगतात. ही चांदीची वाटी वळसंगमध्ये असून माशाळ इथले लोक ही वाटी परत मिळवण्यासाठी येऊ शकतात, असा इथल्या नागरिकांचा समज आहे. त्यातूनच संपूर्ण रात्र जागरण करुन वळसंग ग्रामस्थ या वाटीचं संरक्षण करतात. 


दोन वर्षांनंतर झालेल्या 'बाळबट्टल'साठी भक्तांची गर्दी
पूर्वी हातात तलवारी, वेगवेगळी हत्यारे हातात घेऊन या वाटीचे संरक्षण केले जात होते. मात्र मागील पाच ते सहा वर्षांपासून प्रशासनाने शस्त्र वापरण्यास मनाई केली. त्यामुळे आता शस्त्रांशिवाय बाळबट्टल हा साजरा केला जातो. चौडेश्वरी देवीच्या पाच दिवस चालणाऱ्या यात्रेच्या तिसऱ्या दिवशी बाळबट्टल साजरा होतो. या दिवशी रात्री बारानंतर हातात चांदीची वाटी घेऊन बाळबट्टल तलवारीसह नगरप्रदक्षिणा घालतो. यावेळी त्या वाटीचे सरंक्षण करण्यासाठी हजारो लोक या नगरप्रदक्षिणेत सामील होतात. विशेष म्हणजे या यात्रेत सर्वधर्मीय लोक सामील होतात. कोरोनामुळे दोन वर्षे ही यात्रा झालेली नव्हती मात्र यंदाच्या वर्षी हजारो भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा आणि कर्नाटकातील भक्तगण या यात्रेत सहभागी झालेले होते.