अमरावती : अमरावती जिल्ह्यात वनविभागाने लाखो रुपये खर्चून औषधी वनस्पती उद्यान निर्माण केले. मात्र, आज त्या जागेवर औषधालाही औषधी वनस्पती शिल्लक नाहीत, असं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण या जागेवर औषधी वनस्पती उद्यानाच्या जागेशिवाय काही शिल्लक नाही. आता तर नव्याने त्याच जागेवर बांबू उद्यानाची तयारी वनविभागाने सुरु केली आहे.
नऊ एकर जागेवर कॅम्पा योजनेअंतर्गत औषधी वनस्पती उद्यान होते, असे इथे असलेल्या फलकामुळे समजतं. आज या ठिकाणी लहान मुलांसाठी ठेवण्यात आलेले हे खेळणे आणि बसण्यासाठी असलेले सिमेंटचे बाक शिल्लक आहेत.
उद्यानासाठी सरकारी निधीचा मोठा खर्च झाला. मात्र, उद्यानाची देखभाल मात्र त्यांना करता आली नाही. वनविभागाने केलेला खर्च वाया गेला. त्यामुळे यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी निसर्गप्रेमी करत आहेत.
या उद्यानाच्या निर्मीतीवर व देखभालीवर किती खर्च झाला, याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता, ती माहिती अद्याप दिली गेली नाही. त्यामुळे उद्यानासंदर्भात काय गौडबंगाल आहे, याची उत्सुकता अमरावतीकरांना लागली आहे.