मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून परवानग्यांच्या कचाट्यात अडकलेल्या मुंबई कोस्टल रोडला केंद्राची अंतिम मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/862653048765722624

शिवसेनेचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, कोस्टल रोडला मंजुरी देऊन मोदी सरकारनं उद्धव ठाकरेंना रिटर्न गिफ्ट दिलं तर नाही ना, अशी दबक्या आवाजाच चर्चा आहे. कारण उद्धव ठाकरेंनी जीएसटीला पाठिंबा देण्याचं जाहीर केल्यामुळं राज्य सरकारची मोठी डोकेदुखी दूर झाली आहे.

जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी देखील भाजपला शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर कोस्टल रोडला केंद्राकडून मिळालेल्या अंतिम मंजुरीचे अनेक राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत.

कसा असेल कोस्टल रोड?

नरिमन पॉईंट येथील आमदार निवासापासून सुरू होणारा हा 35 ते 36 किलोमीटरचा किनारपट्टीला लागून असलेला रस्ता कांदिवलीत जाऊन मिळणार आहे. यासाठी 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचं सांगण्यात येतंय. यामुळे शहरातील 18 ठिकाणी उपनगरातील मार्गावर जाण्यासाठी रस्ते तयार होणार असल्याचं सांगण्यात येतं आहे.

खार ते वर्सोव्यापर्यंत भुयारी रस्ता तयार करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. सागरी सेतूमुळे किनारपट्टीवरील लोकांना सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यास कोणताही अडथळा येणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे. म्हणून समुद्रकिनारी लागून 40 ते 60 फुटाचा भाग हा लोकांना फिरण्यासाठी विकसित केला जाणार आहे.

सागरी सेतूपेक्षा हा प्रकल्प कमी पैशात होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.