Pune News : पुणे महापालिकेने सुरक्षा रक्षक (Pune News ) म्हणून दहा तृतीयपंथीयांना (transgender) नोकरीची संधी उपलब्ध करून द्यायचं ठरवलं आहे. तृतीयपंथीयांबद्दलच्या दृष्टिकोनात बदल व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरक्षारक्षक म्हणून काम करणारी तनुश्री भोसले ही काही दिवसांपूर्वी शुभम भोसले होती. पण पुढचं आयुष्य तृतीयपंथी म्हणून जगायचं तिनं ठरवलं आणि लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून ती पुरुषाची स्त्री बनली. पण पुढे नोकरीचं काय असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. तिचा हा प्रश्न पुणे महापालिकेने सोडवला आहे. तिच्यासारख्या दहा तृतीयपंथीयांना सुरक्षारक्षक म्हणून काम द्यायचं पुणे महापालिकेने ठरवलं आहे.
दहापैकी पाच तृतीयपंथीयांना मुख्य इमारतीमध्ये तर इतर पाच जणांना महापालिकेच्या शहरातील इतर वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये नेमण्यात आलं आहे. उपजीविकेसाठी तृतीयपंथीयांना अनेकदा कोणी काम देण्यास तयार होत नाही. त्यामुळं काहीजण चुकीच्या मार्गानं पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात . त्यामुळं सगळ्याच तृतीयपंथीयांबद्दल गैरसमज पसरतो, असं या तृतीयपंथीयांचं म्हणणं आहे. मात्र अशा स्वरूपाची कामे करण्याची संधी मिळाल्यास आपल्याकडं पाहण्याच्या लोकांच्या दृष्टिकोनात बदल होईल, असं या तृतीयपंथीयांना वाटत आहे.
महापालिकेने उचललेलं हे पाऊल पाहून इतरही अनेकजण या तृतीयपंथीयांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढं येतील असं त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना वाटत आहे. त्यामुळं पुणे महापालिकेने केलेल्या या प्रयोगाचं अनुकरण इतर संस्था आणि महापालिकांना देखील करता येणार आहे .
समलिंगी जोडप्यांना लग्नाचा अधिकार मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. तृतीयपंथीयांच्या वेगवेगळ्या अधिकारांसाठी अनेक संस्था आणि संघटना काम करतायत. मात्र त्यांच्यासाठी त्याहून महत्वाचं आहे ते म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळणं. पुणे महापलिकने उचललेलं हे पाऊल म्हणूनच महत्वाचं ठरणार आहे .
या तृतीय पंथीयांच्या अधिकारांबाबतची न्यायालयीन लढाई अनेक वर्ष सुरु आहे. त्या लढाईचा निर्णय जेव्हा लागेल तेव्हा लागेल. मात्र त्या लढाईपेक्षा मोठी लढाई त्यांना सामाजमान्यतेची लढायची आहे. ही समाजमान्यता कोणत्या कार्यक्रमात मागणी करून किंवा वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवर मागणी करून होणार नाही तर त्यासाठी या तृतीयपंथीयांना अशी कामाची प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून द्यावी लागले आणि म्हणूनच पुणे महापालिकेच्या समोर जर हे तृतीयपंथी काम करत असतील तर त्यामुळे लोकांचा दृष्टिकोन बदलणार आहे.
हेही वाचा-