जळगाव : कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर जिल्हा प्रशासनाने मागील काही आठवड्यांपासून अनेक निर्बंध लावत लॉकडाऊन घोषित केले होते. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. बाधित होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात मोठी घट झाल्याने आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या असलेली रुग्ण संख्या आणि आणि बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण असेच राहिले तर पुढच्या पंधरा दिवसात कोरोणा ची दुसरी लाट ओसरली जाणारं असल्याचा अंदाज आता वैद्यकिय सूत्रांनी व्यक्त केला आहे. 


जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर हे ठिकाण कोरोनाच्या बाबत संपूर्ण देशात हॉटस्पॉट ठरले होते. जळगावचा मृत्यूदर हा तेरा टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचला होता, यानंतर मात्र प्रशासनाने सर्वच पातळीवर यंत्रणा गतिमान करीत त्यावर नियंत्रण मिळविले होते. मागील दोन महिन्यांत पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने लोक बाधित झाल्याने आज पर्यंतचा बाधितांचा आकडा हा एक लाख 17 हजारांवर जाऊन पोहोचला आहे. मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील नव्वद टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. 


मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेले लॉकडाऊन आणि चाचण्यांमध्ये केलेली वाढ पाहता बाधित होणाऱ्या रुग्णाच्या संख्णेत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय बाधित झालेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात देखील दिवसागणिक मोठी घट होत असल्याचं दिसून येतं असल्याने अशीच गती कायम राहिल्यास येत्या पंधरा दिवसात जळगाव मध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरली जाण्याची शक्यता आहे. 


Maharashtra Vaccination : आजपासून 18 ते 44 वयोगटासाठीही लसीकरण, राज्यात मोजक्या स्वरुपात होणार लसीकरण


सध्याचा मृत्यूदर हा अडीच टक्क्यांवरून एक टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. तर, बाधित होणाऱ्यांचं प्रमाणही चाळीस टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यंत घसरले असल्याने जळगाव हे कोरोनाच्या सुधारणेच्या बाबत दुसऱ्या स्थानावर जाऊन पोहोचले आहे. जळगावकरांसाठी हे चित्र मोठा दिलासा देणारा ठरत आहे. 


दरम्यान, सध्या कोरोनाबाबत काहीसं दिलासादायक चित्र असलं तरी त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपले प्रयत्न या पुढे ही कायम ठेवले जाणार आहेत, असं जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचं म्हणणं आहे. मागील पंधरा दिवस पूर्वी कोरोंना बाधित रुग्णांना बेड मिळणे ऑक्सिजन मिळणे मोठे जिकिरीचं बनले होते मात्र बाधित होणाऱ्यांच प्रमाण, बरे होणाऱ्या रुग्णाचे प्रमाण आणि वाढविलेली खाटांची संख्या पाहता आज दोनशेहून अधिक ऑक्सिजन बेड हे रिकामे असल्याचं दिसून येत आहे, परिस्थिती सुधारत असली तरी ती पुन्हा बिघडू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे गरजेचे असल्याचं मत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केले आहे.