मुंबई : शिवसेना विरुद्ध नारायण राणे या संघर्षाचा दुसरा भाग पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. कारण नारायण राणे उद्यापासून जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा सुरू करत आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसाची ही यात्रा असेल.


नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेनंतर जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा भाग सुरु ठेवण्याचा निर्धार भाजपा आणि नारायण राणे यांनी केला आहे. त्यामुळे कोकणात खास करून नारायण राणे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे हा संघर्ष तीव्र होऊ शकतो. नारायण राणे तिसऱ्या टप्प्यात तीन दिवसाची जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. त्यातील दोन दिवस सिंधुदुर्गमध्ये असतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन करण्याचा भाजपचा इरादा आहे. एकीकडे भाजपनं जन आशीर्वाद यात्रा सुरु ठेवण्याचा निर्धार केला असतानाच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना मधून नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलय.


नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवले व अटक केली असे त्यांचे लोक बोलत आहेत. कायद्याला, पोलिसांना सहकार्य केले असते तर ही वेळ आली नसती. राणे यांना जेवणावरून उठवणे वाईटच; पण सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना जेवणावरून, भर संसारातून कायमचे कोणी उठवले याचा नव्याने तपास 'ठाकरे' सरकारने करायला हवा. कायद्याचे राज्य मोडण्याचा प्रयत्न करणे हे गांजा मारून पडण्याइतके सोपे नाही. हा महाराष्ट्र आहे, तरीही 'वर आमचे सरकार आहे. महाराष्ट्र केंद्राशी काय संघर्ष करणार?' अशी मस्तवाल व महाराष्ट्रविरोधी भाषा राणे नावाचे केंद्रीय मंत्री वापरतात.


शिवसेनेनं सामनातून जुनी प्रकरणं उकरुन काढण्याचा इशारा दिल्यानंतर नितेश राणेही आक्रमक झाले आणि त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. नारायण राणे जेव्हापासून भाजपत आले तेव्हापासून शिवसेना आणि भाजपचा संघर्ष तीव्र होणार याचे संकेत मिळत होते. आता प्रत्यक्ष मैदानात लढाईला सुरुवात झाली आहे. राणेंना अटक करून शिवसेनेने या संघर्षाला धार दिली. आता हा संघर्ष आणखी कुठलं वळण घेतो ते बघावं लागेल.