पुणे: बहुप्रतिक्षेत पुणे मेट्रोचे या डिसेंबर पूर्वी प्रवासाच्या सेवेत दाखल होईल. शिवाय यासाठीचे तिकीट दर हे दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर असतील. असं पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षितांनी जाहीर केलं. त्यानुसार पहिल्या किलोमीटर साठी प्रवाश्यांना दहा रुपये मोजावे लागतील. प्रवास जितका वाढेल तसा दर कमी होत जाईल. असं दिक्षितांनी सांगितलं. डिसेंबर पूर्वी पिंपरी पालिका ते फुगेवाडी असा सात किलोमीटर तर कोथरूड ते गरवारे महाविद्यालय असा पाच किलोमीटर प्रवास खुला केला जाणार आहे. तेंव्हा या तिकीट दराने प्रवास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.


पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा दोन मार्गावर पुणे मेट्रो धावणार आहे. यापैकी वनाज ते रामवाडी या मार्गावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिरवा कंदील दाखविला आणि मेट्रोची पहिली अधिकृत ट्रायल रन नुकतीच पार पडली. त्यानंतर आज पिंपरी ते स्वारगेट मार्गावर आज ट्रायल रन पार पडली. ही ट्रायल रन सायकल घेऊन प्रवासी कसं प्रवास करू शकतात हे प्रत्यक्षात मेट्रोने दाखविलं. यावेळी पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षितांनी मेट्रोचे तिकीट दर जाहीर केले. दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर प्रवाश्यांना पुणे मेट्रो प्रवासासाठी पैसे मोजावे लागणारेत.


त्यानुसार पहिल्या किलोमीटरसाठी दहा रुपये दर निश्चित करण्यात आलाय. त्यापुढे प्रवास जितका जास्त किलोमीटरचा असेल त्यानुसार टप्याटप्याने दर कमी होतील. अशी माहिती दिक्षितांनी दिली. तसेच याच डिसेंबरपूर्वी प्रवाश्यांच्या सेवेत मेट्रो दाखल होईल असा विश्वास दिक्षितांनी व्यक्त केला. पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील पिंपरी पालिका ते दापोडी या सात किलोमीटर तसेच वनाज ते रामवाडी मार्गावरील वनाज ते गरवारे महाविद्यालय या पाच किलोमीटर असा प्रवास करता येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर मेट्रो सुरू करण्याचा मानस असल्याचं दिक्षित म्हणाले. त्यावेळी दिल्लीच्या धर्तीवर प्रवाश्यांना तिकिटासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.


पुणे मेट्रोतून सायकल सह प्रवास करण्याची मुभा


पुणे मेट्रोतून सायकल सह प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे. केवळ मेट्रोच्या प्लॅटफॉर्मपर्यंत नव्हे तर थेट सायकल घेऊन मेट्रोत प्रवास करू शकता. यासाठी वेगळं तिकीट काढण्याची ही गरज नसेल. प्रवाश्यांना हा प्रवास नेमका कसा करता येणार, याचं आज प्रात्यक्षिक पार पडलं.  पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचं रूप पूर्णतः बदलून जाणार आहे. परंतु प्रत्यक्षात जेंव्हा मेट्रो धावेल तेंव्हा या मेट्रोपर्यंत पोहचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे पर्याय उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. त्यातलाच एक पर्याय म्हणजे सायकल. हीच सायकल घेऊन मेट्रोतून कसा प्रवास करता येईल.  ही सायकल तुम्ही लिफ्टने मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर घेऊन आलात की मेट्रोत तुम्हाला प्रवेश करता येतो. प्रवेश केल्यानंतर मेट्रोच्या दोन्ही बाजूकडील या कोपऱ्यात सायकल पार्क करता येणार आहे. मग तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथं तुम्ही पोहोचू शकता. तिथं मेट्रोतून सायकल बाहेर घेऊन तुम्हाला तुमची काम उरकता येणार आहेत.