आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या कायद्याच्या वैधतेचा मुद्दा मात्र उच्च न्यायालयाने विचारार्थ खुला ठेवला आहे. ‘जीआर’ रद्दबातल ठरवल्याने २५ मे २००४ पासून सरकारी-निमसरकारी कार्यालयांत देण्यात आलेल्या पदोन्नतींविषयी आवश्यक फेरबदल १२ आठवड्यांत करा, असे आदेशही न्यायमूर्ती अनुप मोहता व न्यायमूर्ती ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठाने दिले आहेत. मात्र, या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावे याकरिता सरकारी वकिलांनी स्थगिती मागितल्याने खंडपीठाने त्याप्रमाणे तीन महिन्यांसाठी या आदेशाला स्थगिती दिली आहे.
आता हा विषय सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. राज्य सरकारबरोबरच उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे बाधित होणारे अनेक अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या संघटना सर्वोच्च न्यायालयात जातील हे निश्चित.
जर हा निर्णय लागू झाला तर मोठे फेरबदल होऊ शकतील. या निर्णयानुसार ज्यांच्या पदोन्नती झाली आहे त्या रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही नवी गणितं समोर येण्याची शक्यता आहे. 