Nagpur News : पाऊस थांबून थंडीची चाहूल लागली आहे. शहरात दिवसा ऊन आणि रात्री गारवा असे वातावरण सध्या आहे. संक्रमणाचा काळ असल्याने व्हायरल फीवरचे (viral fever) (विषाणूजन्य ताप) रुग्ण मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. विदर्भात सर्वदूर हीच स्थिती असून प्रामुख्याने ग्रामीण भागात रुग्णांची संख्या अधिक आहे. अधिकाधिक रुग्ण घरगुती उपचारानेच बरे होत आहेत. पण, काहींना उपचारासाठी शहरात यावे लागत असल्याची स्थिती आहे. मेडिकल (GMC) आणि मेयो (IGMC) मधील ओपीडीही व्हायरल फीवरच्या रुग्णांनी फुल्ल असल्याचे दिसून येत आहे.
                 
सध्या घरोघरी ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण दिसून येत आहेत. हा ताप नागरिकांच्या आरोग्यासोबतच खिशावरही परिणाम करत आहे. रुग्णसंख्या वाढल्याने दवाखान्यांमधील गर्दीही वाढलेली दिसून येत आहे. ग्रामीण भागातील नागरिक उपचारासाठी शहरातील शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात (Private Hospital) येत आहेत. या रुग्णांसोबत बसमधून प्रवास करणाऱ्यांना यामुळे धोका निर्माण झाला आहे. रुग्णांची वर्दळ वाढल्याने रुग्णालयातील ओपीडीही तुडुंब भरलेल्या दिसत आहेत. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून थंडीचा हंगाम सुरू होतो. या महिन्यात झालेल्या पावसामुळे हंगामी आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये सर्दी आणि विषाणूजन्य तापाचे सर्वाधिक रुग्ण येत आहेत. विषाणूजन्य तापही बरा होण्यास तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. कोरोनासारखीच लक्षणे असल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.


श्वसनरोगाच्या तक्रारी वाढणार


व्हायरल फिवरचा त्रास जाणवत आहे. घरोघरी घशाची खवखव, ताप, शर्दी, डोकेदुखी, श्वसनात त्रास यासारखे रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच दिवाळी आणि वाढत जाणारी थंडी हा योगही जुळून आला आहे. वातावरणातील बदल, वाढणारी थंडी, ढगाळ वातावरण व त्यामुळे वाढणारे ओझोनचे प्रमाण, फटाके व अन्य वायु प्रदूषण अशा श्वसनरोगास कारणीभूत ट्रिगरमुळे अस्थमा, सीओपीडी आणि अन्य फुफ्फुस विकारांच्या रुग्णांना दुप्पट धोका निर्माण झाला आहे. या दरम्यान योग्य काळजी घेतली नाही, नोव्हेंबर महिन्यापासून मोठ्या प्रमाणात श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होईल, अशी चिंता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. नागरिकांनीही कुठलीही लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करुन घ्यावे असे आवाहनही वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.


व्हायरल तापाची लक्षणे



  • ताप

  • अंगदुखी

  • स्नायू दुखणं

  • खोकला

  • सर्दी किंवा नाक बंद होणं 

  • डोकेदुखी


महत्त्वाची बातमी


'बायकोला साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला'; एकनाथ खडसेंची शहाजीबापूंवर बोचरी टीका