Aaditya Thackeray at Nashik : माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज अतिवृष्टीनं नुकसान (Heavy Rain Damage) झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. नाशिक (Nashik) आणि पुणे (Pune) जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचा दौरा आहे. आज दुपारी 12 वाजता ते नाशिकच्या सिन्नर तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करतील. रात्री ते पुण्यातल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीनंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. 


नाशिक दौऱ्यासाठी मुंबईहून रवाना होताना आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, "राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा. मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी दौरा केला होता. आज आम्ही शेतकऱ्यांना धीर द्यायला जात आहोत. सरकार किती घटनाबाह्य असलं तरीही सरकारी यंत्रणेकडून मदत ही लगेच झाली पाहिजे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी करणारं आमचं सरकार होतं. आता विरोधी पक्षात असलो तरी आमची जबाबदारी म्हणून आम्ही जात आहोत." पुढे बोलताना ते म्हणाले की, "शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या बांधावर उभे राहणार आहोत. शेतकऱ्यांसोबत उभं राहणं हे गरजेचे आहे. दहीहंडी असो वा शिधा वाटपाबाबत घोषणा आणि तारखा फक्त पाहायला मिळतात. कृषीमंत्री आणि इतर मंत्र्यांनी शेतकऱ्यांना जाऊन भेट देणे गरजेचे आहे. राजकारण दूर ठेवा आणि मदत करा."


पाहा व्हिडीओ : सरकार किती घटनाबाह्य असलं तरीही सरकारी यंत्रणेकडून मदत लगेच झाली पाहिजे



शिवसंवादच्या झंझावाती दौऱ्यानंतर आज पुन्हा आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर येणार असून आज ते परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत. त्यांच्याबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे देखील असणार आहेत.


मागील काही दिवसांत परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्यासह राज्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे राज्यातील विविध नुकसानग्रस्त भागांत पाहणी करत आहेत. आज नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सोनारी परिसरात पाहणी करणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांना 50 हजार हेक्टरी नुकसानभरपाईची मागणी करणार असल्याचे समजते.


शिवसेनेत पडझड झाल्यानंतर आदित्य ठाकरेसंह शिवसेनेचे नेते अंबादास दानवे हे देखील राज्यातील विविध भागांना भेटी देत आहेत. शिवसैनिकांसह शाखा उभारणीवर सध्या भर दिला जात आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांत सहभागी होत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान परतीच्या पावसाने दाणादाण उडवून दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील काही दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. या ठिकाणी त्यांनी सरकारला शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. 


दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर आज आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा असून त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उपस्थित असणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात ऑगस्ट महिन्यातही शेतीचे नुकसान झाले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाने पुन्हा शेतकऱ्यांना हवालदिल केले. या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील सोनारी येथे नुकसान ग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत.


असा आहे दौरा


सकाळी 9 वाजता ते मुंबई येथून मौजे सोनारी ता. सिन्नर जि. नाशिककडे प्रयाण करणार आहेत. दुपारी 12 वाजता ते मौजे सोनारी येथे पोहोचून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची, भागांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते पुणे येथे रवाना होणार आहेत.