बुलढाणा : "न्यायालयाबद्दल माझ्या वक्तव्याचा काही चॅनेल्स विपर्यास करत असून त्यावर काही नेते प्रतिक्रिया देत आहेत. संजय राऊत हे विश्व प्रवक्ते असून त्यांनी खालच्या लेव्हलवर येऊ नये. कारण संजय हे नाव इतकं खराब झालंय की मी माझं संजय हे नाव बदलण्याचा प्रयत्न करणार आहे," असं जळगाव जामोद-शेगावचे भाजप आमदार संजय कुटे म्हणाले. एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून संरक्षण आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात सुरु असल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यातच भाजपचे आमदार संजय कुटे यांनी 'कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात, तिथे आम्ही करु,' असं वक्तव्य केलं. त्यावरुन संजय राऊतांनी त्यांना चांगलंच सुनावलं.
"आम्हाला माहित आहे की शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा आमच्या विरोधात कितीही वापरल्या तरीही कोर्ट आमच्यासाठी आहे. कोर्टात आम्हाला न्याय मिळतो, कोर्टातून आम्हाला काय करायचं ते आम्ही भविष्यात करणार आहोत. कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात तिथे आम्ही करु," असं वक्तव्य भाजप आमदार संजय कुटे यांनी काल (14 एप्रिल) पत्रकार परिषदेत केलं होतं. आज शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. यावर आमदार संजय कुटे यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, "न्यायालयाबद्दल माझ्या वक्तव्याचा काही चॅनेल्स विपर्यास करत असून त्यावर काही नेते प्रतिक्रिया देत आहेत. मी काल स्पष्ट म्हटलं की, राज्यात आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम पोलिसांमार्फत सुरु आहे. न्याय देवता ही सर्वोच्च आहे. त्यात खऱ्या गोष्टीला न्याय मिळतो खोट्याला नाही, म्हणून आम्ही न्यायालयात जातो आणि याच गोष्टींमुळे न्याय मिळतो."
महाविकास आघाडी नेत्यांचे न्यायव्यवस्थेवर सवाल
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना कथित आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी दिलासा मिळाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. न्यायव्यवस्थेमध्ये एका विशिष्ट विचारांचे लोक आहेत हे स्पष्ट दिसत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून संरक्षण आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात सुरु असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या याच सूरात सूर मिसळत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही न्यायव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. अटकेपासून केवळ भाजपच्या नेत्यांना संरक्षण कसं मिळतं असा सवाल त्यांनी विचारला.